
स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑक्टोबर : येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील २००३-०४ च्या इयत्ता १२ वी (कला शाखा) बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एका स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र आले. कोळकी येथील रेडस्टोन हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमात, जुन्या मित्र-मैत्रिणींना पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी जुन्या आठवणी, किस्से आणि प्रेरणादायी प्रसंगांना उजाळा देण्यात आला.
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात व्हॉट्सॲपच्या माध्यमातून या सर्व मित्र-मैत्रिणींनी एकत्र येण्याचे ठरवले. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून या स्नेह मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आणि सर्वांना तसे आवाहन करण्यात आले होते. ‘मित्र’ या शब्दातच विश्व सामावलेले असते, या भावनेने सर्वजण या मेळाव्यास उपस्थित राहिले.
गेल्या २२ वर्षांत प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रगती केली आहे. विद्यालयीन शिक्षण घेत असताना शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आणि संस्कारांच्या जोरावर, या बॅचचा प्रत्येक माजी विद्यार्थी आज सामाजिक, शैक्षणिक, सहकार, शासकीय, कृषी, आर्थिक आणि औद्योगिक अशा विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोण, कुठे आणि काय करतो, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मित्र-मैत्रिणींनी स्वतःची ओळख करून दिली. यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतातून विद्यालयातील शिक्षक आणि प्राध्यापकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. कित्येक वर्षांपूर्वीच्या शैक्षणिक काळातील प्रेरणादायी भूतकाळ, जुने किस्से, आणि सुख-दुःखाच्या अनेक गोष्टी संवादाच्या माध्यमातून शेअर केल्या गेल्या.
संवादाच्या या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी काही खेळ आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. भविष्यात एकमेकांच्या सुख-दुःखात, आनंदात आणि संकट काळात खंबीरपणे साथ देण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला. अनेक मित्र-मैत्रिणींना विविध अडचणींमुळे किंवा संपर्क होऊ न शकल्याने या मेळाव्यास उपस्थित राहता आले नाही. त्यांच्यासाठी भविष्यात पुन्हा एकदा असाच भव्य स्नेह मेळावा आयोजित करण्याचा निश्चयही यावेळी करण्यात आला.
या अनोख्या मेळाव्याची आठवण म्हणून उपस्थितांना पुष्परोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन अभंग यांनी केले. प्रसेनजित आढाव यांनी प्रास्ताविक केले, तर किरण शिर्के आणि सुषमा पखाले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुनील भोसले यांनी आभार मानले. स्नेहभोजनाने या आनंददायी कार्यक्रमाची सांगता झाली. या मेळाव्यासाठी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
