स्थैर्य, खटाव, दि. 01 : खटाव तालुक्यातील वाकेश्वर, भुरकवडी या दोन गावातील मिळकतींचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले. ड्रोन कॅमेर्याच्या सहाय्याने केलेला जिल्ह्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग राबविण्यात आला.
वाकेश्वर येथील शुभारंभ प्रसंगी भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक अनिल लोखंडे, वडूजचे उपअधिक्षक कृष्रा सांगवीकर, कराडचे भूमि अभिलेख अधिकारी बाळासाहेब भोसले, सातारचे प्रवीण पवार, कोरेगांवचे डॉ. शैलेश साठे, मेढ्याचे तुषार पाटील, सातारचे नगरभूमापन अधिकारी किरण नाईक, शिल्पा जवळ व वडूज विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
यासंदर्भात माहिती देताना सांगवीकर यांनी सांगितले की, ड्रोन कॅमेर्याच्या सहाय्याने मोजणी करण्याचा हा पथदर्शी प्रयोग आहे. या माध्यमातून गावातील पक्की घरे, छपरे, मोकळी जागा, रस्ते यांची मोजणी होणार आहे. प्रत्येक मिळकतधारकाला एक प्रोपर्टी कार्ड मिळणार आहे. या कार्डाचा उपयोग खरेदी-विक्री व्यवहार तसेच बँक कर्जासाठी होवू शकतो. यावेळी सरपंच प्रतिनिधी नामदेव फडतरे, माजी उपसरपंच अनिल कचरे, दत्तात्रय फडतरे, ग्रामसेवक सोमनाथ सावंत, बाबा फडतरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.