
दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । मुंबई । ग्लोबल वॉर्मिंग ही वाढती समस्या आहे आणि संपूर्ण जग नूतनक्षम ऊर्जेची निर्मिती आणि वापर यांच्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतदेखील या गोष्टीचा पुरस्कर्ता आहे. देशात कोणत्या प्रकारच्या नूतनक्षम ऊर्जेचे वर्चस्व आहे? सौर ऊर्जा. सरकारी मान्यताप्राप्त योजना आणि सौर ऊर्जा वापर वाढवण्यासाठी आखून दिलेली लक्ष्ये यांच्यामुळे भारत सध्या नूतनक्षम ऊर्जेच्या सर्वाधिक वापरकर्त्या देशांपैकी एक ठरला आहे. सौर ऊर्जा युनिट्स मोठ्या प्रमाणावर स्थापित करण्यात आल्यामुळे यात मोठे योगदान मिळाले आहे आणि सोलर रूफटॉप्सचा वापर करणाऱ्या व्यक्तींसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याची क्षमता आणखी वाढली आहे. रूफटॉप सोलरचे फायदे कोणते आहेत याबद्दल सविस्तर सांगत आहेत इकोफायच्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री नाम्बियार.
सोलर रूफटॉप म्हणजे काय?
सोलर रूफटॉप म्हणजे निवासी इमारती/ आर्थिक संस्थांच्या छतावर स्थापित केलेल्या सौर पॅनल्स आहेत, ज्यातून सौर ऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो आणि वाणिज्यिक व निवासी वापरकर्त्यांसाठी त्याचे मोठे फायदे आहेत.
रूफटॉप सोलरचे फायदे:
वीजबचत: देशभरात नियमित वीजपुरवठा जीवाश्म इंधनाद्वारे केला जात असताना इंधनाच्या किमती वाढत असल्यामुळे ही गोष्ट अत्यंत महागडी ठरते. सौर ऊर्जा सहज उपलब्ध आहे आणि ती इंधनावर आधारित विजेला एक पर्याय म्हणून वापरता येते. त्यामुळे दीर्घकाळात तो एक स्वस्त पर्याय ठरतो.
साध्यता: भारतासारख्या देशात विविध प्रकारचे समाज राहतात. त्या सर्वांकडे पेट्रोल आणि डिझेलव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचा स्त्रोत असेलच असे नाही. सौर ऊर्जा त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरला आहे.
कमी देखभाल: रूफटॉप सोलर स्थापित केल्यानंतर उत्पादनाला अत्यंत कमी देखभालीची गरज भासते आणि त्यामुळे अतिरिक्त खर्चही कमी होतो. रूफटॉप सोलरचे आयुष्य दीर्घ असल्याचे मानले जाते.
कार्बन उत्सर्जनात घट: स्थापनेपासून ते वापरापर्यंत रूफटॉप सोलर कोणत्याही प्रकारचे घातक हरितगृह वायू उत्सर्जित करत नाहीत आणि आरोग्याचे धोकेही निर्माण करत नाहीत. त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन कमी होते.
हरित उद्योग: रूफटॉप सोलरच्या वापरामुळे तुमच्या कंपनीच्या जीवाश्व इंधनाच्या वापरात घट होते आणि तुमचा उद्योग अधिक हरित होतो. त्यामुळे तुमचा उद्योग हवामानासाठी उत्तम तर ठरतोच पण त्याचबरोबर कार्यान्वयन खर्चही कमी करतो.
रूफटॉप सोलर वीजनिर्मिती करत असला तरी त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत, जसे पाणी गरम करणे आणि इमारत किंवा संस्थेला गरम हवा देणे. याशिवाय भारत हा कटिबंधीय देश असल्यामुळे दिवसाचा बराच वेळ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे रूफटॉप सोलर हा अत्यंत सोयीचा नूतनक्षम ऊर्जा स्त्रोत ठरला आहे. स्थापनेच्या प्रारंभीच्या खर्चाबाबत चिंता उद्भवू शकते. तथापि, आता त्याचा ताण कमी करण्यासाठी विविध प्रकारचे पर्याय लोकांसाठी उपलब्ध आहेत.