दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । सातारा । शाहूनगर मधील युनायटेड वेस्टर्न कॉलनी ते अजिंक्य बाजार चौक या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि बंद पथदिवे या दोन गोष्टींच्या निषेधार्थ येथील रहिवासी एडवोकेट सचिन तिरोडकर यांनी अजिंक्यतारा चौकांमध्ये बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र या चौकात उपोषणासाठी उभारण्यात आलेल्या मांडवावर शहर विकास विभागाने हरकत घेत तो मांडव तात्काळ काढून घेण्याची सूचना केली. या आंदोलनासंदर्भात बोलताना तिरोडकर म्हणाले, सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत शाहूनगरचा समावेश होऊन दोन वर्षे उलटली. शाहूनगर येथील युनायटेड वेस्टर्न कॉलनी ते अजिंक्य बाजार चौक या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच या मार्गावरील पथदिवे अनेक दिवसापासून बंद असून नागरिकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. रस्त्याचे तीव्र उताराचे वळण यामुळे येथे मोठ्या अपघाताची शक्यता असून त्यामुळे जीवित व वित्त हानी होण्याची सुद्धा शक्यता आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली तरी सुद्धा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. रस्त्यांची दुरुस्ती आणि रस्त्यावरील पथदिवे सुरू करणे याकरिता हे बेमुदत उपोषण मी सुरू करत आहे. मात्र तिरोडकर यांच्या उपोषणाला पालिकेच्या शहर विकास विभागाने हरकत घेतली. येथील अजिंक्यतारा रिक्षा स्टॉप चौकामध्ये उभारण्यात आलेल्या मांडवाला शहर विकास विभागाचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी नोटीस बजावली. तुम्हाला अशा पद्धतीने वर्दळीच्या ठिकाणी उपोषण करता येणार नाही, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. मात्र मांडवाला जागा मिळाली नाही तरी रस्त्याच्या एका कोपऱ्यात बसून मी माझे बेमुदत उपोषण करील मात्र या प्रश्नावर मागे हटणार नाही, यासंदर्भात जर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सचिन तिरोडकर यांनी दिला आहे.