‘डीजे’च्या समस्येवर ॲड. सचिन शिंदे यांचा कायदेशीर तोडगा; कायमस्वरूपी ध्वनी प्रदूषण धोरणाची केली मागणी


स्थैर्य, फलटण, दि. ०७ सप्टेंबर : फलटण शहरातील मिरवणुकांमध्ये होणाऱ्या डीजेच्या कर्णकर्कश आवाजाच्या समस्येवर केवळ तात्पुरती कारवाई न करता, एक कायमस्वरूपी धोरण आखण्याची गरज असल्याचे मत शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. सचिन शिंदे यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत, शहरासाठी एक स्वतंत्र ध्वनी प्रदूषण नियमावली तयार करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

फलटणमधील गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा वापर आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण हा गेल्या वीस वर्षांपासूनचा विषय आहे, असे ॲड. शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, “डीजे साऊंडचा आवाज किती डेसिबलपर्यंत असावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट न्यायनिवाडा दिलेला आहे. पोलीस प्रशासनाने या निर्देशांची दखल घेऊन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.”

केवळ गणेशोत्सवापुरती चर्चा न करता, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. “फक्त गणपती विसर्जनच नाही, तर शहरातील सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ध्वनी प्रदूषणाबाबतचे नियम निश्चित केले पाहिजेत. यासाठी फलटण नगरपालिका आणि सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन शहरासाठी एक स्वतंत्र मार्गदर्शक सूचनावली तयार करता येईल,” असा विधायक तोडगा ॲड. सचिन शिंदे यांनी सुचवला आहे.


Back to top button
Don`t copy text!