शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या ॲड. रुपनवर यांचा ‘जीवनसुगंध’ सर्वांना प्रेरणादायी ठरेल – विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या माजी विधानपरिषद सदस्य ॲड. रामहरी रुपनवर यांनी स्वानुभव आणि अध्यात्म यांची सांगड घालत त्याचा ‘जीवनसुगंध’ पुस्तक रुपाने सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून त्यांचे आणि प्रकाशकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हे पुस्तक सर्वांना सकारात्मक मनोवृत्तीची जोपासना करण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरेल आणि या पुस्तकाचे सर्व स्तरातून स्वागत होईल असा मला विश्वास वाटतो, अशा भावना विधानपरिषदेचे सभापती, रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केल्या. विधानपरिषदेचे माजी सदस्य ॲड. रामहरी रुपनवर यांनी लिहिलेल्या “जीवनसुगंध” या पुस्तकाचे प्रकाशन विधानभवनात झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार कालिदास कोळंबकर, माजी विधानपरिषद सदस्य किरण पावसकर, पुस्तक प्रकाशक बकुळ पराडकर, डॉ. आदिनाथ रुपनवर, जगन्नाथ वीरकर, नवनाथ पायगुडे, मोहन तिवारी, रविंद्र महादेव येवले, सभापती यांचे सचिव महेंद्र काज, सुहास ठाकूर यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुस्तकाचे विषय आणि महत्त्व लक्षात घेता, हा प्रकाशन समारंभ श्री. रुपनवर हे आपले शेजारी असल्याने, हा कार्यक्रम फलटणमध्ये करावयाचा होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी या पुस्तक प्रकाशनासाठी एकत्र आलो. परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपला म्हणजे सर्व संपले असे नाही तर लेखन आणि समाजकार्य सुरुच ठेवण्याचा श्री. रुपनवार यांचा स्वभावधर्म सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या पुढील लेखनकार्यासदेखील माझ्या शुभेच्छा आहेत असे सभापती, श्री. नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. आपल्या आई-वडिलांनी लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचा संस्कार बिंबवला. थोरामोठ्यांच्या सहवासातून आनंदी आणि सुखमय जीवन कसे जगायचे, लोकहिताचे कार्य सतत कसे सुरु ठेवायचे हे शिकता आले. त्यातूनच हा जीवनसुगंध पुस्तक रुपाने सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी हे लेखनकार्य हाती घेतले. पुस्तकातील शब्द हेच शस्त्र, आक्रमकता-लवचिकता, नम्रता, न्याय नीती-चारित्र्य, सकारात्मक विचार, शरीर ही सर्वोत्कृष्ट संपत्ती इत्यादी प्रकरणे सर्वांना निश्चितच आवडतील असे लेखक श्री. रुपनवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!