अ‍ॅड. प्रथिश विश्वनाथ यांना वीर जिवाजी महाले पुरस्कार प्रदान

प्रतापगड उत्सव समितीमार्फत शिवप्रतापदिन साजरा


सातारा – अ‍ॅड. पारिजात पांडे पुरस्कार प्रदान करताना पंडित काका मोडक, विनायक काका सणस, सुनील गायकवाड.

स्थैर्य, सातारा, दि. 4 डिसेंबर : प्रतिवर्षीप्रमाणे यंदाचाही शिवप्रतापदिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतापगड उत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (वाई) यांच्या वतीने हा कार्यक्रम श्री महागणपती घाट येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात वीर जिवाजी महाले पुरस्कार केरळ येथील अ‍ॅड. प्रथिश विश्वनाथ यांना प्रदान करण्यात आला.श्री. प्रतिथ विश्वनाथ यांनी आजवर 12,000 पेक्षा जास्त हिंदू मुलींना लव्ह जिहादपासून वाचवले असून 5,000 पेक्षा अधिक आरोपींना शिक्षा होण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हिंदू सेवा केंद्राच्या माध्यमातून ते केरळ राज्यातील गरीब हिंदूंना अन्न व औषधांचे वितरण करतात. ख्रिस्ती व मुस्लिम धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवली असून शबरीमला आंदोलन उभे करून ते यशस्वी केले हे त्यांचे मोठे कार्य मानले जाते. पंताजी काका बोकील स्मृती पुरस्काराचे मानकरी नागपूर उच्च न्यायालयाचे वकील अ‍ॅड. पारिजात मधुसूदन पांडे (रेशीमबाग, नागपूर) होते.

या वेळी बोलताना ते म्हणाले, महाराजांनी प्रतापगडची कठीण लढाई जिंकलीच, पण पुढील पंधरा दिवसांत न थांबता त्यांनी थेट पन्हाळ्यापर्यंत मुलुख जिंकला. हा दिग्विजयही आनंदोत्सवाचा विषय आहे. बार कौन्सिल अध्यक्ष म्हणून मी पहिल्यांदा पंताजी काका बोकील यांच्या वंशजांच्या घरी जाऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती आणि आज मला त्यांच्याच नावाने पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

यावेळी उत्सव समितीतर्फे घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धांचे सुद्धा बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमात श्री डान्स अ‍ॅकॅडमी, वाईचे श्री. गणेश फडसें यांनी सादर केलेला ‘शिववाथा’ हा नृत्यप्रयोग विशेष दाद मिळवून गेला.त्यानंतर आख्यान फेम शाहीर चंद्रकांत माने यांचा जोशपूर्ण पोवाडा सादर झाला. सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने आणि ऋतुजा माने आणि सहकार्‍यांच्या ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ या कार्यक्रमाने वातावरण दणाणून गेले.
मानपत्राचे वाचन कुमारी वैष्णवी सचिन शेंडे व सौ. चंद्रकला भोसले यांनी केले. आनंद पटवर्धन यांनी सूत्रसंचलन केले. उत्सवाचे आयोजन श्रीमती विजयाताई भोसले (अध्यक्ष – प्रतापगड उत्सव समिती) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या सोहळ्यास विनायक काका सणस, पंडित काका मोडक, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. महेश कुलकर्णी, अ‍ॅड. मुके, अ‍ॅड. श्रीराम ठोसर, अ‍ॅड. सत्यजीत तुपे, अ‍ॅड. राजू मराठे, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!