
स्थैर्य, फलटण, दि. ०९ नोव्हेंबर : समाजसेवा आणि महिला सक्षमीकरणातील सक्रिय कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ‘झुणका भाकर – कष्टाची भाकर’ उपक्रमाची सुरुवात, उपविभागीय रुग्णालयाचे पुनर्जीवन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केलेला पाठपुरावा, तसेच महिलांसाठी रोजगारनिर्मिती अशा विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्या फलटणमध्ये ओळखल्या जातात.
डराडो एनजीओ, नॅचरल चॅरिटेबल ट्रस्ट आणि सोना महिला विकास प्रतिष्ठानमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. भाजप प्रवेशानंतर फलटणच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या प्रवेशामुळे भाजप-राष्ट्रवादी महायुतीला महत्त्वाची ताकद मिळाल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे.

