
स्थैर्य, 23 जानेवारी, सातारा : सातारा नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष पदासाठी अॅड.दत्तात्रय बनकर यांची वर्णी लागली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांची भाजपकडून अंतिम यादी तयार झाली असून स्वीकृत पदासाठी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते रवी पवार, भाजपच्या रीना भणगे, गोटूशेठ भंडारी, खासदार उदयनराजे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते पंकज चव्हाण, आणि माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांची वर्णी लागली आहे. रवी पवार नगरसेवक व्हावे यासाठी खुद्द बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे प्रयत्नशील होते. परंतु काही कारणास्तव रवी पवार यांच्या नगरसेवक पदाला नेहमीच हुलकावणी मिळत आली.परंतु यंदा शिवेंद्रसिंहराजे यांनी पहिल्याच यादीत रवी पवार यांचे नाव स्वीकृत पदासाठी दिल्याने रवी पवार यांच्या निष्ठेला फळ मिळाले अशी चर्चा नगरपालिका वर्तुळात सुरू होतो.
सातारा नगरपालिकेवर प्रथमच खासदार उदयनराजे भोसले आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा फडकवला आहे. नगराध्यक्ष पदावर अमोल मोहिते विराजमान झाल्यानंतर सातार्यात उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक कोण होणार याची चर्चा सुरू झाली होती.
तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून रीना भणगे,रवी पवार,गोटूशेठ भंडारी यांची वर्णी लागली असून उदयनराजे यांच्या गटातील पंकज चव्हाण आणि शंकर माळवदे यांची वर्णी लागली आहे. अनेक कार्यकर्ते स्वीकृत साठी इच्छुक असल्यामुळे पहिल्याच टर्ममध्ये सर्वांना संधी मिळण्याची शक्यता नसल्याने पहिल्या यादीतील नगरसेवकांना एक वर्षाचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे.

