आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२३ । मुंबई । औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक ११ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय उपलब्ध असून १५४९३२ एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ६५२ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आलेली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते तर दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयतून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!