
दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। सातारा। शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत खटाव व दहिवडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुकांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल यांनी केले आहे.
वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. वसतिगृह कार्यालयातून विहीत नमुन्यातील वसतिगृह प्रवेशाचे अर्ज प्राप्त करून घेवून ते हायस्कूल विभागागात 30 जून पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह (मागिल वर्षाचे गुणपत्रक, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, दिव्यांग असल्यास दिव्यांग दाखला व अनाथ असल्यास अनाथाचा दाखला इ.) वसतिगृह कार्यालयात सादर करावेत. वसतिगृहात इयत्ता 8 वी. पासून पुढील शिक्षण घेणार्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रू. 2.50 लाख पेक्षा कमी आहे अशा अनु. जाती संवर्गातील विद्यार्थाना गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो.
वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत निवास, भोजन, नाष्टा, दुध, फळे, अंडी, अंथरूण-पांघरूण, शैक्षणिक स्टेशनरी, वह्या व पुस्तके मोफत पुरविली जातात. तसेच प्रवेशितांना दरमहा रू. 500/- निर्वाहभत्ता दिला जातो. विद्यालय विभागाच्या सर्व व ज्या कॉलेजमध्ये गणवेश सक्तीचा आहे त्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रोख रक्कम दिली जाते. शैक्षणिक सहल खर्च व जर्नल खरेदीची रक्कम देखील दिली जाते.