
दैनिक स्थैर्य | दि. 29 मार्च 2025 | फलटण | श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर असलेला प्रशासक हटवण्यात यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी याची अंमलबजावणी तातडीने करून प्रशासकाकडून संचालक मंडळाकडे तत्काळ कार्यभार सोपवण्यात यावा, असे आदेश पारित केले. तदनंतर सुद्धा प्रशासक यांच्याकडून वेळकाढूपणा करण्याचे काम सुरू आहे, असे मत श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केले.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी आदेश पारित केल्यानंतर प्रशासकांच्या वेळेनुसार कारखाना ताब्यात घेण्यासाठी कारखान्याच्या मुख्य कार्यालयात चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यासह संचालक मंडळ यांनी उपस्थिती लावलेली होती. प्रशासकांकडून वेळकाढूपणा करत असल्याचे जाणवल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. शेंडे बोलत होते. यावेळी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. शेंडे म्हणाले की, श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली होती. ती नियुक्ती करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या याचिकेनुसार मागणी केलेली होती. त्यांच्या प्रशासक नियुक्तीच्या आदेशाला आव्हान करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासकाला काढून पुन्हा संचालक मंडळाकडे कार्यभार देण्याबाबत आदेश पारित केले आहेत.
या सर्व बाबींचा विचार करता मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानंतर तातडीने प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी प्रशासकाला हटवण्याचे आदेश दिले व प्रशासकाने तत्काळ कारखान्याचा कार्यभार हा संचालक मंडळाकडे सुपूर्द करण्यात यावा, असे सुद्धा आदेश पारित केले आहेत. तरीसुद्धा प्रशासकांकडून कार्यभार सोपवण्यासाठी वेळकाढूपणा करत असल्याचे मत यावेळी डॉ. शेंडे यांनी व्यक्त केले.
आता पुन्हा उद्या प्रशासकीय ताबा देण्यासाठी कारखाना स्थळी येणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी डॉ. शेंडे यांनी दिली.