दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये सोमवारपासूनं मुख्याधिकाऱ्यांचे प्रशासक राजं सुरू झाले . मुख्याधिकाऱ्यांच्या देखरेखी अंर्तगत कार्यकारी समिती द्वारे आचारसंहिता लागू होईपर्यंत कारभार चालविला जाणार आहे.
नगर विकास विभागाच्या निर्देशाप्रमाणे सातारा जिल्हयातील पाचगणी व महाबळेश्वर वगळता इतर सहा नगरपालिकांच्या नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपल्याने मुख्याधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे . याचे आदेश सोमवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर परिषद संकलन विभागाला प्राप्त झाले . त्यामुळे सातारा रहिमतपूर कराड फलटण म्हसवड वाई या पालिकांवर नियुक्त मुख्याधिकाऱ्यांनाच प्रशासक म्हणून चार्ज देण्यात आला . जिल्हा प्रकल्प संचालक अभिजीत बापट यांनी त्या त्या मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आदेश मंगळवारी तातडीने रवाना केले . सातारा पालिकेचा चार्ज मुख्याधिकारी बापट यांनी स्वीकारत कामकाजाला सुरवात केली . नगरपालिका अधिनियम 1965 कलम 315 ब प्रमाणे मुख्याधिकारी प्रशासक या नात्याने कार्यकारी समिती रचना करून कामकाज करण्यात येते . यामध्ये पालिकेच्या विभाग प्रमुखांचा समावेश असतो . या कार्यकारी समितीने दिलेले संकलित प्रस्ताव प्रशासकाच्या साक्षरीने मान्य होऊन त्या कामाची अंमलबजावणी केली जाते .
पाचगणी व महाबळेश्वर येथील पालिकांची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे . 1 जानेवारी पासून प्रशासक म्हणून मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत . सहा जिल्ह्यातील पालिकांमधील राजकीय वर्दळ सध्या थंडावली आहे . ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने पालिका निवडणुका चार महिने पुढे ढकलण्याच्या विषयाला सर्वपक्षीय मान्यता देण्यात आली आहे . त्यामुळे पुढील आचारसंहिता साधारण मार्च 2021 पर्यंत लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे . तोपर्यंत मुख्याधिकारीच पालिकांचा कारभार सांभाळणार आहेत.