दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२१ | अहमदनगर | कर्जत शहर व तालुक्यातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. या विकासकामांमुळे कर्जत शहराच्या वैभवात भर पडणार आहे तसेच राज्यातील सर्व तालुक्यात टप्प्याटप्प्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. वीज व पाणी यासारख्या सार्वजनिक सुविधांच्या वापरामधे शिस्त आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्जत येथे केले.
कर्जत शहर व तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, आ.राजेंद्र पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शासन व्यवस्था चालविताना अनेक अडचणी येतात. कोरोना, निसर्ग तसेच तौक्ते चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे आर्थिक विकास मंदावला होता परंतु आता आर्थिक परिस्थिती पूर्ववत होत आहे.
विकास कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात मात्र सर्वांच्या सहकार्याने त्यावर मात करण्यात येईल. विकास कामे करताना भेदभाव न करता सर्वांना निधी देण्यात येईल. भविष्यात या भागात नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार असून तरुणांनी समाजकारण करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
शासनाने शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पिक कर्ज उपलब्ध करून दिले तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली असून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकास कामे मुदतीत पूर्ण करतानाच त्याचा दर्जा उच्च प्रतीचा ठेवण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कर्जत तालुक्याच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांची कामे करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जत तालुक्यातील विकास कामांचे कौतुक केले आणि ते अनुकरणीय असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
आज झालेल्या उद्घाटनात कर्जत पंचायत समिती विस्तारित बांधकाम, बस डेपो व व्यापारी संकुल बांधकाम, तालुका प्रशासन प्रशासकीय इमारत बांधकाम, तलाठी कार्यालय, महसूल कर्मचारी निवासस्थाने, शासकीय विश्रामगृह बांधकाम तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी वसाहत निर्माण कामांचा समावेश आहे.