दैनिक स्थैर्य | दि. ९ मार्च २०२३ | फलटण |
राज्य शासनाकडून निरा-देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या सुमारे ३९७६.८३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा जलसंपदा विभागाने शासन निर्णय करून आज ‘जीआर’ प्रसिद्ध केला आहे. या निधीस मान्यता देण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अधिकार्यांचे आभार मानले आहेत.
नीरा-देवघर धरण हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील देवघर गावाजवळ बांधलेले नीरा नदीवरील सुरुवातीचे मोठे धरण आहे. या प्रकल्पाचे लाभक्षेत्र कृष्णा खोर्यामध्ये आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशामध्ये येतो. धरणाचा एकूण साठा १२.९८ अ.घ.फू. इतका आहे. या प्रकल्पाचे दोन कालवे असून उजवा कालवा १५८ किलोमीटर लांबीचा व डावा कालवा १८ किलोमीटर लांबीचा आहे. निरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्यामुळे भोर तालुक्यातील ६६७० हेक्टर, खंडाळा तालुक्यातील ११८६० हेक्टर, फलटण तालुक्यातील १३५५० हेक्टर व माळशिरस तालुक्यातील १०९७९ असे एकूण ४००५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच सांगोला व पंढरपूर तालुक्यातीलही क्षेत्र ओलिताखाली येणार आहे; परंतु यापूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारकडून हा प्रकल्प होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले गेले. आजपर्यंत दुष्काळी भागातल्या अनेक तालुक्यातील शेतकर्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप या सरकारने केले आहे; पण, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे सरकार आल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा करून नीरा-देवघर प्रकल्पाची बंद पडलेली फाईल सर्व अधिकार्यांना विश्वासात घेऊन पुढे नेली. या क्षेत्रातील शेतकर्यांना कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प होणे खूप गरजेचे आहे. यासाठी राज्यस्तरावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून याबाबत त्यांच्या दालनामध्ये सचिव व अधिकार्यांची बैठक घेऊन यास मंजुरी घेतली व कालच याबाबतचा ‘जीआर’ राज्य शासनाने काढला आहे. आता लवकरच निविदा निघणार आहेत व काम सुरू होणार असल्याचा विश्वास खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केला.त्यामुळे या भागातील दुष्काळ आता कायमस्वरूपी संपणार आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निरा-देवघर प्रकल्पातूनच एकूण पाणी वापरामधून धोम-बलकवडी हा प्रकल्प चारमाही होता, तो आता आठमाही केला आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकर्यांसाठी हा खूप मोठा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवून फलटण तालुका सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही. या भागातील शेती व्यवसाय वाढल्यास अनेक रोजगार उपलब्ध होतील व जे तरुण रोजगारासाठी नोकरी, व्यवसायासाठी मुंबई, पुणे येथे जात आहेत, ते आता फलटण तालुक्यामध्येच आधुनिक पद्धतीने व्यवसाय करू लागतील.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारमधील सर्व मंत्री, अधिकारी व पदाधिकारी यांचे फलटण तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.