गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासन सज्ज; मंडळांसाठी नियमावली जाहीर

ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण, ऑनलाइन परवान्यांना प्राधान्य; विसर्जनासाठी विशेष नियोजन


स्थैर्य, फलटण, दि. २७ ऑगस्ट : फलटण शहरात व तालुक्यात आगामी गणेशोत्सव २०२५ शांततेत, उत्साहात आणि नियमांचे पालन करून साजरा व्हावा, या उद्देशाने प्रशासनाने सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. दि. २६ ऑगस्ट रोजी पंचायत समिती सभागृहात फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक यशस्वीपणे पार पडली. यावेळी उत्सवासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या आणि नियमावली यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रशासनाने स्पष्ट केले की, सर्व गणेश मंडळांनी आपल्या आवश्यक परवान्यांसाठी http://www.mhpolice.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. बैठकीदरम्यान काही ज्येष्ठ नागरिकांनी ध्वनी प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले. यावर, शासनाच्या निर्देशानुसार विशिष्ट दिवशी (दि. २८/०८, ३१/०८, ०२/०९, ०५/०९ आणि ०६/०९) सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकांना सूट असेल, असे सांगण्यात आले.

शहरातील श्री क्षेत्र जबरेश्वर मंदिर परिसराच्या शांततेचे महत्त्व लक्षात घेऊन, गणेशोत्सवादरम्यान मंदिर परिसरात वाद्य वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या जवळील पुरातन शाळेच्या इमारतीला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सक्त आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीमंती प्रियांका आंबेकर यांनी दिले आहेत. मिरवणुकीत डीजे किंवा मोठ्या आवाजाचे संगीत वाजवण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे.

गणेशमूर्ती विसर्जनाच्या सोयीसाठी नीरा उजवा कालव्याला दि. ०६ सप्टेंबर रोजी पाणी सोडण्यात येणार असून, विसर्जनासाठी ही मुदत दि. ०८ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. कालव्याचा पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने मूर्तींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि मंडळांनी मूर्ती विसर्जन करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. मोठ्या मूर्ती असल्यास त्या पालिकेकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. निखील मोरे यांनी केले आहे.

शहरातील आवाजाची पातळी मोजण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथक विविध ठिकाणी तपासणी करत आहे. तसेच, मिरवणूक रथांवर वीजप्रवाहाचा धोका लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी आणि अनधिकृत वीजजोडणी टाळावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सातारा जिल्ह्यात उत्सव काळात मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

या बैठकीस फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गट विकास अधिकारी श्री. कुंभार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. निखील मोरे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार शहा, प्रादेशिक परिवहन विभागाच्या निरीक्षक श्रीमती स्वाती चव्हाण, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे श्री. रवींद्र ननवरे यांच्यासह तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!