
स्थैर्य, फलटण (रोहित वाकडे) : गेल्या तीन महिन्यांहून अधिक कालावधीपासून कोरोनाचे ग्रहण संपूर्ण जगाला लागले आहे. केंद्र सरकार, प्रत्येक राज्याचे राज्य सरकार कोरोनाचा सामना करण्यात व्यस्त आहे. आरोग्य, पोलीस, महसूल आदी प्रशासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात दक्षतेने दिवस – रात्र झटत आहेत. प्रशासकीय पातळीवरचे कोरोनाबाबतचे हे गांभीर्य ज्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी आहे त्या जनतेतील काही महाभाग किंबहुना जरा जास्तच महाभाग मात्र अजूनही कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. विविध मार्गाने वारंवार कोरोनाबाबत जनजागृती होत आहे. मात्र काही लोक अजूनही दक्ष व जागृत होत नाही ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
नजीकच्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7 लाख 19 हजार 665 झाली असून एकूण मृत्यू 20 हजार 160 झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये 22 हजार 252 नव्या रुग्णांची भर पडली तर, 467 मृत्यू झाले. सलग पाच दिवस प्रतिदिन 20 हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, 4 लाख 39 हजार 947 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांवर पोहोचले आहे. 2 लाख 59 हजार 557 रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येत भारताने रशियाला मागे टाकले असून अमेरिका व ब्राझील हे दोन देशांत भारतापेक्षा जास्त रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये 2 लाख 41 हजार 430 नमुना चाचण्या झाल्या. एकूण 1 कोटी 2 लाख 11 हजार 92 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
खरं तर गेल्या 100 हून अधिक दिवसांपासून केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला कोरोनाच्या प्रार्दुभावाने वेठीस धरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या 6 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, इराण, मेक्सिको, ब्राझील, पेरू, अमेरिका, फ्रान्स, इटली, स्पेन आणि ब्रिटन या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे 137, 235, 302, 315, 391, 456, 576, 607 आणि 651 मृत्यू झाले आहेत. भारतात एक लाखामागे 505 कोरोनाबाधित आहेत तर, जगभरात लाखामागे सरासरी 1453 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. हे प्रमाण चिलीमध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे 15,459, पेरूमध्ये 9,070 तर अमेरिका, ब्राझील, स्पेन, रशिया, ब्रिटन, इटली, मेक्सिको या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे 8560, 7419, 5358, 4714, 4204, 3996 आणि 1955 इतके लोक कोरोना बाधित झाले.
भारतात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात हे प्रमाण 14.27 असून जगभरातील सरासरी प्रमाण 68.29 इतके आहे. देशभरात एकूण 20 हजार 160 मृत्यू झाले आहेत.
महाराष्ट्राचा विचार केला तर कोरोनाच्या बाबतीत संपूर्ण देशात आपले राज्य आघाडीवर आहे. राजकारण करणारे याला सरकारचे अपयश म्हणत असले तरी जनतेची बेफीकीरी हे त्यामागचे ठळक कारण म्हणावे लागेल. मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत संपूर्ण प्रशासन आपापल्या पातळीवर कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कार्यरत आहे. एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली तर त्याच्या संपर्कातील लोक हुडकून काढणे, त्यांचे समाजापासून विलगीकरण करणे, या सर्व व्यक्तींची देखभाल करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, बाधीत व्यक्ती राहत असलेल्या परिसरात संचारबंदीची कारवाई करणे, परजिल्ह्यातून प्रवास करुन येणार्या नागरिकांची तपासणी करणे, बाधीत भागातून आलेल्या नागरिकांना गृह विलगीकरण करणे, त्यांची तपासणी करणे अशी अत्यंत क्लिष्ट कामे या प्रशासकीय यंत्रणेला गेल्या 3 महिन्यांपासून करावी लागत आहे. त्यामुळे हे करत असताना लॉक डाऊन संदर्भातील निर्बंध नागरिक पाळत आहेत की नाही हे पाहण्याकडे प्रशासनाचे थोडेफार दुर्लक्ष होणे हे धोक्याचे जरी असले तरी काही अंशी अपरिहार्यही आहे असेच म्हणावे लागेल.
कोरोनाच्या प्रार्दुभावाची भिती अजूनही सर्वत्र असताना अनेकजण सोशल डिस्टंसींग पाळत नाहीत, मास्कचा वापर करत नाहीत, सार्वजनिक ठिकाणी सर्रास थुंकतात आणि त्यासाठी प्रशासनाला दंडात्मक कारवाईचा बडगा उचलावा लागतो आहे हे लाजिरवाणेच आहे. खरं तर एव्हाना लोकांच्यात स्वयंशिस्त यायला पाहिजे होती पण अजूनही तसे होत नाही हे आश्चर्यकारक आहे. अर्थव्यवस्था अडचणीत येवू नये म्हणून शासन हळूहळू निर्बंध हटवत आहे पण जसजसे निर्बंध कमी होत आहेत तसतशी रुग्णसंख्याही वाढती आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे या कठीण परिस्थितीत जनतेने दक्षता बाळगून स्वयंशिस्तीने प्रशासनाला कोरोना विरुद्धच्या लढाईत साथ देणे अतिशय महत्त्वाचे आहे.