
स्थैर्य, फलटण, दि१९: फडतरवाडी ता.फलटण येथे आत्तापर्यंत ११ लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर या मध्ये दुर्दैवाने तीन लोकांचा मृत्यू झाला असून याकडे प्रशासन लक्ष देत नाही. प्रशासनाच्या अनास्थेमुळे बळी गेलेत असा गंभीर आरोप प्रगतशील बागायतदार कल्याणराव काटे यांनी केलेला आहे.
फलटण तालुक्यातील कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तर या मध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र जास्त व चिंताजनक आहे. त्यातच सध्या अनेक ग्रामपंचायती मध्ये प्रशासक नेमले आहेत. मात्र एक प्रशासक पाच ते सहा गावे सांभाळत आहे. मग प्रशासक कधी भेटणार? तो काय गावासाठी उपाययोजना करणार? लोकांची आरोग्य तपासणी साठी पथके कधी नेमणार ? गावातील मुख्य रस्ते व सार्वजनिक ठिकाणे, या ठिकाणी औषध फवारणी, स्वच्छता मोहीम कधी करणार? असे एक ना अनेक प्रश्न पडत आहेत. दरम्यान अशी कामे रखडली असून ग्रामस्थांनी नक्की कोणाकडे दाद मागायची ? का सर्वसामान्य लोकांनी मरणयातना अशाच भोगायच्या ? असे अनेक प्रश्न प्रगतशील बागायतदार कल्याणराव काटे यांनी उपस्थित केलेले आहेत.