
स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑगस्ट : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील बांधवांना राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत, फलटण तालुक्यातील मराठा समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. एकीकडे सरकारचा निषेध करत असतानाच, दुसरीकडे मुंबईतील आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुक्यातील गावोगावांमधून भाकरी, ठेचा आणि भाजीपाला संकलित करून मुंबईला पाठवण्याच्या कामाला वेग आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा मराठा मोर्चा मुंबईत शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना, त्यांना मूलभूत सुविधा न पुरवता त्यांची गैरसोय केली जात असल्याने राज्यभरातील मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद फलटण तालुक्यातही उमटले असून, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतांसाठी गावात येणाऱ्या सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पाण्याचा घोटही द्यायचा नाही,” असा एकमुखी निर्धार अनेक गावांमधील बैठकांमधून केला जात आहे.
आपल्या बांधवांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी तालुक्यातील चव्हाणवाडी, साखरवाडी, पिंपळवाडी, जिंती, बिबी, वाघोशी, झिरपवाडी यांसह अनेक गावांमधील मराठा बांधव आणि भगिनींनी पुढाकार घेतला आहे. दररोज हजारो भाकरी आणि ठेचा-भाजी तयार करून मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मदतीने आझाद मैदानावर पोहोचवले जात आहे.
आज, रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी चव्हाणवाडी येथील मराठा बांधवांनी तयार केलेले अन्न आझाद मैदान, मुंबई महापालिका परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जमलेल्या आंदोलकांना उपलब्ध करून दिले.