कुपोषणमुक्ती, महिला सक्षमीकरणासाठी काम करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२३ । मुंबई । राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करण्यात येईल. या संदर्भात पोलीस, महिला आयोग तसेच बालहक्क आयोग, विधी व न्याय विभागाची मदत घेऊन प्राधान्याने काम केले जाईल, अशी भूमिका मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर झाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने कामास सुरूवात केली आहे.

राज्यातील बालमृत्यू, बालविवाह, कुपोषण या समस्यांच्या निर्मूलनाबरोबरच महिलांमध्ये आंत्रप्रन्योरशीप विकसित करण्याचेही काम महिला व बालविकास विभाग करते. महिला व बालविकास, आयसीडीएस, बालहक्क समिती, महिला आयोग, राजमाता जिजाऊ मिशन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला व बालविकास विभाग महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाचे काम करत आहे. प्रत्येक महिलेला शिक्षण, काम, पोषणासंदर्भातील माहिती, बालकांच्या विकासात पुरुषांचा सहभाग, अशा विविध मार्गांतून हा विभाग यापुढे काम करेल, असा विश्वास कु. तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

अंगणवाडी सेविका या महिला व बालविकास विभागाच्या अँबेसेडॉर आहेत. या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचतगट तसेच सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून राज्याला एक आदर्श वाटेल, अशी व्यवस्था आपण निर्माण करू. पोषण अभियानात संपूर्ण देशात राज्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यंदा ही महाराष्ट्राची कामगिरी अशीच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!