बियाणे आणि खतांचा पुरेसा पुरवठा करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । पुणे । यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कृषि निविष्ठांचा पुरेसा पुरवठा करावा, असे निर्देश  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल टिंगरे, भिमराव तापकीर,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषि सहसंचालक रफिक नाईकवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, ऊसाला पाणी अधिक लागत असल्याने त्याऐवजी सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याची गरज आहे. कृषि विभागाने त्यादृष्टीने प्रयत्न करावे. ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी असल्याने  गाळप बंद झालेल्या कारखान्यांकडील हार्वेस्टर इतर क्षेत्रातील ऊसतोडणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. शेतात उभ्या असलेल्या ऊसाच्या वाहतुकीसाठी आणि एकरी तोटा भरून काढण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्ह्यात रेशीम व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून चांगले उत्पन्न मिळत असल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिली.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बोटे यांनी सदारीकरणाद्वारे २०२२-२३ च्या खरीप हंगाम नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात मुख्य पिकाखालील खरीप हंगामासाठी २ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे. एकूण २७ हजार ६७६ क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून १५ हजार १२५ क्विंटल उपलब्ध झाले आहे. तर खतांचे २ लाख १५ हजार १२२ टन आवंटन असून ७४ हजार ३८६ टन खते उपलब्ध आहेत. यावर्षी ४ लाख १० हजार ७२ खातेदारांना ४ हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे नियोजन असून १०४७ कोटींचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

चालू वर्षी सर्व १९२२ गावांचा ग्रामस्तरीय कृषि आराखडा तयार करण्यात आला आहे. ७ हजार हेक्टर क्षेत्रावर चार सूत्री भात लागवड करण्यात येणार आहे. हुमणी नियंत्रण अभियान अंतर्गत १० हजार सापळे लावण्यात येणार आहे. ६० हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस पाचट अभियान राबविण्यात येणार आहे. २०५० हेक्टरवर कोरडवाहू फळबाग लागवड करण्यात येणार असून १० हजार विहिरींचे पुनर्भरण करण्यात येणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

बैठकीस कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृती दिनानिमित्त  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!