फलटण शहर व तालुक्यातील जनतेसाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणार : जिल्हाधिकारी शेखर सिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


शहर व तालुक्यातील वैद्यकीय सुविधांसाठी जाहीर केलेले पत्रकारांचे आंदोलन स्थगित 

स्थैर्य, फलटण, दि. ६ : शहर व परिसरातील वाढती लोकवस्ती त्याचबरोबर अलीकडच्या काळात राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे फलटण शहर व तालुक्यात उदभवणार्‍या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषद रुग्णालय सक्षमपणे उभे करण्याची शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांची मागणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मान्य केली आहे, या मागणीसाठी पत्रकारांनी लक्षवेधी उपोषण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या विनंतीनंतर मागे घेतले आहे.

फलटण शहर व तालुक्यातील करोना पार्श्‍वभूमीवर व अन्य बाबीसाठी फलटण येथे आलेल्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजराव जगताप यांच्यामार्फत निरोप देऊन पत्रकारांना तहसीलदार कार्यालय येथे वेळ देऊन पत्रकारांच्या मागण्या समजावून घेतल्या. सदर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन देतानाच शहरातील उपजिल्हा रुग्णालय कोविड उपचार रुग्णालय म्हणून तातडीने उभे करण्याचे व नगर परिषद हॉस्पिटल बाबत माहिती घेऊन ते ही सक्षमपणे उभे करण्याचे, झिरपवाडी येथील जुने ग्रामीण रुग्णालय पुन्हा उभे करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिल्याने पत्रकारांच्यावतीने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ व जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी जिल्हाधिकारी यांच्या विनंतीवरुन लाक्षणिक उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी अमिता गावडे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, डॉ. सुभाष गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे, पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे या अधिकार्‍यांसह फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

दरम्यान पत्रकारांनी निवेदनाद्वारे केलेल्या मागणीला पाठिबा देत महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या मागणीला आपला विरोध नाही तथापी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाऐवजी प्रशासनाशी सुसंवाद ठेवून या प्रश्‍नाची सोडवणूक करावी असे आवाहन त्यांनी केले होते, त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना पत्रकारांचे निवेदन पोहोचल्यानंतर त्याबाबत आवश्यक त्या सूचना प्रशासनाला देण्याबरोबरच शासनाच्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांना दूरध्वनीद्वारे उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनीही जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा करुन या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जुन्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्‍न आपण यापूर्वीच जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत विषय घेऊन त्याचा प्रस्तावही शासनस्तरावर पाठविला आहे त्याचा पाठपुरावा आपण स्वतः करीत आहोत. उर्वरित प्रश्‍नातही पत्रकारांसमवेत राहणार असल्याची ग्वाही दिली आहे. याबाबत त्यांनीही जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे आश्‍वासन दिले असून त्यांनीही जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांशी या प्रश्‍नाबाबत सविस्तर चर्चा केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!