दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । सातारा । येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून समानसंधी केंद्र व विद्यार्थी संपर्क केंद्राचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी [निवड श्रेणी ] व सातारा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष श्रीमती माधवी सरदेशमुख यांचे हस्ते करण्यात आले.या वेळी सातारा विभागाच्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त स्वाती इथापे, सातारा जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त व जिल्हा जाती पडताळणी समितीचे सचिव नितीन उबाळे, छत्रपती शिवाजी कॉलेजच्या समानसंधी केंद्राचे सल्लागार समितीचे सचिव प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,सदस्य प्रा.डॉ.शिवाजी पाटील,प्रा.डॉ.राज चव्हाण,अधीक्षक तानाजी सपकाळ प्रा. दिपकराज शिंगे,सोमनाथ जाधव,विद्यार्थी कार्यकारिणी सदस्य तुषार बोकेफोडे,प्रथमेश हबळे, विक्रम खरात,समीक्षा चव्हाण,प्रतिक मुंजेवार,इत्यादी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व समान संधी केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाने सदर केंद्राचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्राचार्यांच्या केबिनशेजारी असलेल्या संपर्क कक्षाचे फीत कापून उद्घाटन करून समान संधी केंद्राच्या सल्लागार व विद्यार्थी कार्यकारिणीच्या सदस्यांना बोलताना त्या म्हणाल्या की आयुक्तालयाने दिलेल्या सूचनानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या अडचणी सोडविणे ,विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचे अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीचे निवारण करणे,समाज कल्याणच्या परदेशी शिष्यवृत्तीची माहिती देणे,अनुसूचित जाती जमाती , विमुक्त जाती,इतर मागास वर्ग, भटक्या जमाती, महिला,दिव्यांग,आणि इतर दुर्लक्षित घटक, यांना करिअरच्या संधी सांगणे, मागवर्गीय
विद्यार्थ्यांना गतिमान करून समान संधी प्राप्त करून देणे,राज्य आणि केंद्र यांच्या योजनांची माहिती देणे इत्यादी अनेक विध हेतू ठेवून कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे .शिक्षक वर्गाने आणि स्वतः विद्यार्थ्यांनी वंचितांच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. समान संधी केंद्र हे देशात समानता निर्माण करण्यासाठी जाणीव जागृती करेल. तसेच आत्मनिर्भर होण्यासाठी कार्य करत राहील असे त्या म्हणाल्या. उपायुक्त स्वाती इथापे यांनीही या केंद्राचे काम चांगले होण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांनी सजगतेने कार्य करावे असे आवाहन केले.
प्रारंभी समान संधी केंद्राचे सचिव प्रा.डॉ सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.शिवाजी पाटील यांनी आभार मानले .या कार्यक्रमास मराठी,समाजशास्त्र विभागातील विद्यार्थी तसेच समानसंधी केंद्राशी सलग्न असलेले अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.