पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सिंगापूरमधील आकर्षणांमध्ये भर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० ऑक्टोबर २०२२ । मुंबई । जगभरातील सर्व पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या सिंगापूरमध्ये सातत्याने नवनवीन आकर्षणांची उपलब्धता वाढवून जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर दिला जातो. आता सिंगापूरमधील अशा नावीन्यपूर्ण अद्भूत, अनोख्या आकर्षणांच्या यादीत आणखी आकर्षणांची भर पडली आहे. या क्षेत्रातील आघाडीच्या माउंट फॅबर लीझर ग्रुपतर्फे (एमएफएलजी) सेंट्रल बीच बाजार आणि स्काय हेलिक्स सेंटोसा पॅनोरामिक राइड ही नवी आकर्षणे निर्माण करण्यात आली आहेत. त्यामुळे आता सिंगापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांचा आनंद आणखी वाढणार आहे.

रमणीय सेंटोसा बेटावरील सेंट्रल बीच बाजार हे मनोरंजनाचे अद्भूत केंद्र सप्टेंबर महिन्यात खुले करण्यात आले असून डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या स्काय हेलिक्स सेंटोसा या रोमांचकारी अनुभव देणाऱ्या केबल कार राईडमुळे थरारक, रोमांचकारी पर्यटनाची खुमारी आणखी वाढली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सिंगापूरला भेट येणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे पर्यटक भारतातील असून, सिंगापूर हे भारतीय पर्यटकांच्या आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे भारतीय पर्यटकांना ही नवी आकर्षणे अधिक उत्तम अनुभव देतील.

माउंट फॅबर लीझर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक ब्युहडी बोक म्हणाले, “माऊंट फॅबर लीझर ग्रुपसाठी भारत हा फार पूर्वीपासून सर्वांत महत्त्वाची पर्यटकांचा स्रोत असणारी बाजारपेठ असून गेल्या काही वर्षांतील आमच्या यशातील तिचा मोलाचा वाटा आहे. भारतातून येणाऱ्या पर्यटकांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. पर्यटकांसाठी सेंट्रल बीच बाजार आणि स्काय हेलिक्स सेंटोसा यांसारखी नवीन आकर्षणे उपलब्ध केल्याने आम्हाला आनंद होत आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी नेहमीच प्रथम पसंतीचे आकर्षण ठरणाऱ्या सिंगापूर केबल कार प्रमाणे ही नवी आकर्षणेही सर्वांच्या पंसतीला येतील याची आम्हाला खात्री आहे.”

सेंटोसा सेंट्रल बीच बाजार हे एकाच ठिकाणी संपूर्ण कुटुंबांसाठी, तरुणांसाठी आणि मनाने तरुण असलेल्या ज्येष्ठांसाठी मनोरंजन आणि जेवणाचे वैविध्यपूर्ण अनुभव देते. सेंटोसा एक्सप्रेस बीच स्टेशनपासून काही पावलांच्या अंतरावर हे ठिकाण असून येथे गुड ओल्ड डेज फूड कोर्ट,   वेस्टर्न ग्रिल आणि फन शॉप आहे. येथे पर्यटकांना स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घेता येतो. तर सेंटोसा स्कायजेट हे आग्नेय आशियातील सर्वांत उंच  म्युझिकल  कारंजे असून इथला वॉटर फाउंटन शो जगभरात प्रसिध्द आहे. तर आठ इंटरनॅशनल फूड स्ट्रीटवरील संकल्पनामुळे पर्यटकांना जगभरातील खाद्यपदार्थांचा एका ठिकाणी आस्वाद घेता येतो. विंग्स ऑफ टाइम हा खुल्या समुद्रातील एकमेव मल्टी-सेन्सरी नाईट शो आणि सर्व वयोगटांसाठी आनंददायक सिम्युलेशन राइड्स आणि कार्निव्हल गेम्स पर्यटकांच्या आनंदात भर घालतात.


Back to top button
Don`t copy text!