दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी गावामध्ये शासकीय नियमाप्रमाणे बंद असलेली गुटखा विक्री राजरोसपणे चालू आहे. ती पूर्णपणे बंद करण्यात यावी, तसेच इतरही अवैध व्यवसाय मटका आणि जुगार चालू आहेत. प्रशासनाने लक्ष घालून ते बंद करावेत, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक महिला आघाडीच्या वतीने महिलांच्या हस्ते गावच्या सरपंच, पोलिस पाटील यांना देण्यात आले.
२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमावेळी हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, १९ जुलै २०१२ रोजी प्रकाशित शासकीय नियमावलीप्रमाणे गुटखा उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली असताना गोखळी गाव आणि परिसरात गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे. त्याचबरोबर अवैध प्रकार मटका, जुगार चालू आहेत. असे अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी महिलांच्या ३३१ सह्यांचे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक सातारा, प्रांताधिकारी फलटण, उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण, तहसीलदार फलटण, संस्थापक युवक मित्र ह.भ.प. बंडा तात्या कराडकर, व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष दीपक जाधव, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांना माहितीसाठी देण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सौ. स्वप्नाली गावडे, ग्रामविकास अधिकारी गणेश दडस, पोलिस पाटील विकास शिंदे, खटकेवस्तीचे पोलिस पाटील राजेंद्र धुमाळ यांनी हे निवेदन स्वीकारले.
गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज गावडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार गावात सर्व दुकानदार, पानटपरीधारक यांना गुटखा बाळगणे व विक्री बंद करण्यात यावी यासाठी लेखी पत्र दिले जाईल. त्यातूनही विक्री बंद केली नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गोखळी गावातील युवकांनी २५ वर्षांपूर्वी दारू गाळणे व विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली. आजपर्यंत बंदी आहे. यापुढे सुरू करण्याचे कोणी धाडसही करणार अशाच पध्दतीने गावातील अवैध व्यवसाय बंद करण्याची कार्यवाही करू, असे ग्रामपंचायतीच्या वतीने आश्वासन दिले.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी हभप सुजित गावडे महाराज म्हणाले की, गावागावात राजरोसपणे दारू, गुटखा, मटका, जुगार चालू असल्याने आज देशाची भावी पिढी म्हणून ज्याच्याकडे आशेने पाहत आहोत, त्या हजारो तरुणांमध्ये व्यसनाधीनतीचे प्रमाण वाढत आहे. शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक नुकसान होत आहे. व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने.महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रथम सर्व प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे.कार्यवाहीची वाट पाहू, त्यानंतर पुढील निर्णय व्यसनमुक्त युवक संघ घेईल, असे गावडे महाराज यांनी सांगितले.
कु. कल्याणी किर्वे हिने लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याविषयी.मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यसनमुक्त युवक संघ महिला आघाडी महिला, हनुमान माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ, व्यसनमुक्त युवक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी मानले.