सेंद्रीय शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी – मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । सातारा । माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद व कृषी विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त डॉ. जे.के. बसू  सेंद्रीय शेती व आधुनिक शेती पुरस्कराचे वितरण मुख्य कार्यकारी विनय गौडा यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषर्देच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा म्हणाले, सेंद्रीय शेती काळाची गरज आहे.  सेंद्रीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून शेतकऱ्यांनी बाजार पेठेचा अभ्यास करुन आपला उत्पादीत केलेला माल बाजार पेठेत विकला तर आर्थिक उन्नती नक्की होईल. जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांसाठी ॲप तयार केला आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादीत मालाची नोंद करावी.

हरीत क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे कृषीतील योगदान खूप मोलाचे आहे. त्यांनी अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या. त्यामधील रोजगार हमी योजना तर देशाने अवलंबली आहे. डॉ. जे.के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कराची रक्कम कमी आहे. यापुढे प्रथम क्रमांकास 25 हजार, द्वितीय क्रमांकास 15 हजार व तृतीय क्रमांकास 10 हजार असे रोख रक्कम पारितोषिक म्हणून दिले जाईल. तसेच सेंद्रीय गाव हा   पुरस्कार सुरु करण्यात येणार आहे. ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रीय शेती केली जाईल त्या गावाला सेंद्रीय गाव म्हणून पुरस्कार दिला जाईल, असेही श्री. गौडा यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.

माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिन साजरा करण्यात येत आहे. कै. वसंतराव नाईक यांनी जमिनीची उत्पादन क्षमता वाढावी म्हणून मृदसंधारणेचा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला. तसेच पाझर तलाव, कोल्हापूर बंधारे, नाला बांध योजना यासारख्या अनेक याजना सुरु केल्या, असे  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. माईनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. घुले यांनी केले. या कार्यक्रमास शेतकरी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

डॉ. जे.के. बसू सेंद्रीय व आधुनिक शेती पुरस्कार 2022-2023 : प्रथक क्रमांक अरुण कचरे, वाघोली, ता. कराड, द्वितीय क्रमांक जालिंदर दडस, टाकेवाडी ता. माण, तृतीय क्रमांक प्रविण काटे, आवर्डे ता. पाटण व उत्तेजनार्थ ऋषिकेश ढाणे, पाडळी ता. सातारा.

या कार्यक्रमाध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषि) अधिकारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!