स्थैर्य, दि ३: बॉलिवूड अभिनेता विजय राज याला महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली आहे. विजय राजवर चित्रपटाच्या सेटवर एका महिला कलाकाराचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. विजय विरोधात भादंवि कलम 354 (महिलेचा विनयभंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये सुरू होते चित्रपटाचे शूटिंग
विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शेरनी’ या चित्रपटात विजय राजची महत्त्वाची भूमिका आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरु आहे. यासाठी चित्रपटाची टीम विदर्भातील गोंदियात आली होती. चित्रपटाचे सर्व कलाकार गोंदियातील ‘हॉटेल गेटवे’ येथे सध्या वास्तव्याला आहेत. येथेच विजय राजने एका महिला कलाकाराचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
चित्रपटाचे शूटिंग थांबले
विजय राजच्या अटकेनंतर ‘शेरनी’ चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. या महिलेच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी पहाटे अभिनेत्याला हॉटेलमधून अटक केली. या प्रकरणात गोंदिया पोलिस काही वेळात निवेदन जारी करू शकतात.
ड्रग्ज प्रकरणात दुबईत झाली होती अटक
यापूर्वी विजय राजला 2005 मध्ये दुबईमध्ये ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती.
‘कौवा बिर्याणी’ दृश्यासाठी प्रसिद्ध
‘रन’ या चित्रपटामधील ‘कौवा बिर्याणी’ सीनसाठी विजय राज खूप लोकप्रिय झाला होता. धमाल, वेलकम, दीवाने हुए पागल, रघु रोमियो, मुंबई एक्स्प्रेस, बॉम्बे टू गोवा आणि मान्सून वेडिंग हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत.