अभिनेता आकाश कुंभारचे ‘गडद अंधार’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । १० मार्च २०२३ । सातारा । चित्रपट सृष्टीत काम करणं जरी प्रत्येकाच स्वप्न असलं तरी ते पूर्ण होत नाही. मात्र प्रयत्नात सातत्य ठेवल्यास कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे पुण्यातील आकाश कुंभार या युवकाने दाखवून दिले आहे. आकाशने आपली इच्छा व महत्वकांक्षेच्या जोरावर ‘गडद अंधार’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण केले आहे.

आकाश हा सामान्य कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील चंद्रकांत कुंभार हे कृषी अधिकारी होते. त्याला कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्याने स्वकर्तृत्वावर या क्षेत्रात स्थान निर्माण केलं आहे. नुकतेच आकाश कुंभार याला ८ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता’ असे नामांकन मिळाले आहे. यासाठी त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

या अनुभवाविषयी बोलताना आकाश म्हणाला, “मी मागील १० वर्षांपासून टेक्निशियन म्हणून काम करत असताना अनेक वेळा ऑडिशन दिल्या. शेवटी ‘गडद अंधार’ च्या रुपात माझं स्वप्न सत्यात उतरलं. कॅमेऱ्याच्या मागे काम करण्यापासून ते कॅमेऱ्याला सामोरे जाण्यापर्यंतचा हा प्रवास होता. या चित्रपटात काम करणं म्हणजे कठीण परीक्षाच होती. कारण बऱ्यापैकी चित्रपटाचं शूटिंग हे अंडरवॉटर होत. यासाठी विशेष प्रशिक्षण ही घ्यावं लागलं. हा चित्रपट गोवा, मालदीव व तारकर्ली या ठिकाणी चित्रित झालेला आहे. ही 4 मित्रांची कथा असून यात माझी भूमिका ही पराग नावाच्या मुलाची आहे.”

पुढे बोलताना आकाश म्हणाला, “चित्रीकरणादरम्यान एक शिस्त लागली. अंडरवॉटर शूटसाठी पुण्यात भरपूर सराव केला. विविध आउटडोर ऍक्टिव्हिटी केल्या. पाठांतरावर माझा विशेष भर होता. या चित्रीकरणादरम्यान सहकलाकार नेहा महाजनकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तिच्या अनुभवाचा मला खुप जास्त फायदा झाला. चित्रपटाचे संगीतकार रोहित राऊत यांच्याबरोबर मी 3 व्हिडीओ गाणे चित्रित केले आहेत. चित्रपटात पराग कशी धमाल करतो हे पाहण्यासाठी नक्की चित्रपट बघा.”


Back to top button
Don`t copy text!