दैनिक स्थैर्य | दि. १८ मार्च २०२३ | फलटण |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा समाज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा असावा असाच होता. तोच विचारांचा वारसा समाजातील तरुणांना स्पर्धात्मक युगात बौद्धिक प्रबळ बनवण्यासाठी जयंती मंडळ सुरू करत असलेले विविध सामाजिक उपक्रम व येणारी भीम जयंती डीजे व फटाकेमुक्त करणार असल्याने पिंपरद येथील भीम जयंती जिल्ह्यात आदर्शवत ठरेल, असा विश्वास फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी व्यक्त केला.
पिंपरद (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, पिंपरद या संस्थेच्या प्रमाणपत्र वितरण प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. आढाव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, पिंपरद (फलटण) या संस्थेचे जेष्ठ सल्लागार व विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सातारा सर्कलचे अध्यक्ष शरद मोरे, संस्थेचे अध्यक्ष नीरज मोरे, उपाध्यक्ष विकास मोरे, सचिव विक्रांत मोरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. रमेश आढाव पुढे बोलताना म्हणाले की, पिंपरदसारख्या ग्रामीण भागातील भीम जयंती सोहळ्याचे अधिकृत शासकीय नोंदणी असणारे हे एकमेव मंडळ असेल. तरुणांच्या पुढाकाराने असे मंडळ स्थापन होणे ही निश्चित समाज परिवर्तनाची दिशा आहे. भीम जयंती मंडळाच्या वतीने प्रत्येक महिन्याला विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून होणारे उपक्रम समाजाला निश्चितच योग्य दिशा देतील, असा आशावाद प्रा. आढाव यांनी व्यक्त केला. तरुणांसाठी वाचनालय, महिलांसाठी विविध बचत गट योजना असे विविध उपक्रम जयंती मंडळाच्या वतीने राबवावेत, अशा सूचनाही यावेळी प्रा. रमेश आढाव यांनी केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सचिन मोरे म्हणाले की, शासकीय नोंदणीकृत डॉ. आंबेडकर जयंती मंडळ व त्या माध्यमातून होणारे उपक्रम ही काळाची गरज आहे. या उपक्रमाला समाज सकारात्मक भावनेतून नक्कीच स्वीकारेल. नवीन सकल्पना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, मात्र तरुणांनी आपल्या घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे हे यशाचे गमक असते. बौद्धिक उंची कमी असणारे सामाजिक दुफळी निर्माण करतात. त्यांना आपल्या कार्यातून उत्तर द्या, असा सल्ला यावेळी सचिन मोरे यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शरद मोरे यांनी शासकीय अधिकृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळची संकल्पना विषद केली. २०२३ ला साजरी होणारी भीम जयंती ही शांततापूर्ण व विविध जातीधर्मांना एकत्रित करत एक अभूतपूर्व सोहळा असेल, असे सांगताना मागील काही वर्षात समाजाला दिशादर्शक कार्य करणार्या आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान या जयंती सोहळ्यात करणार असल्याचे आवर्जून सांगितले. अतिशय पारदर्शक कारभार हा संस्थेचा पाया असेल, असे सांगताना विविध क्षेत्रातील यशस्वी लोकांची व्याख्यानमाला लवकरच पिंपरद येथे सुरू होईल, असे यावेळी शरद मोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळाच्या शासकीय प्रमाणपत्राचे वितरण यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार विकास मोरे यांनी मानले. यावेळी विनोद गायकवाड, अमित खुडे, प्रसन्न मोरे, समीर मोरे, विजय बनसोडे, राहूल मोरे, संतोष मोहिते, हनुमंत मोरे, बापू मोरे, इंद्रजीत मोरे, अभिजीत मोरे, कुमार मोरे, तानाजी जाधव, शिवा पवार, गजानन पवार, श्रीरंग मोरे, गोविंद मोरे, रवींद्र पालखे, संजय बनसोडे, साजन कांबळे, सर्वेद मोरे, राजदीप मोरे, शुभम बनसोडे, ऋषिकेश बनसोडे, सुहान मोरे, आदी उपस्थित होते.