दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२२ । वाई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वावर आणि राज्याच्या पुरोगामीत्वावर आज धार्मिक मुदयांना पुढे करून हल्ले होत आहेत. त्याव्दारे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांनी गोंधळून न जाता जबाबदारीने प्रतिवाद करावा आणि पक्षाची भूमिका समाजामध्ये पोहोचवावी, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रे निमित्ताने वाई खंडाळा महाबळेश्वर या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी व कार्यकर्त्यांचे संवाद साधताना पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे सुलक्षणा सलगर, सारंग पाटील, राजकुमार पाटील, रविकांत वरपे, मेहबूब शेख, संकल्प डोळस, सातारा जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ , उदय कबुले, नितीन भरगुडे पाटील, दत्ता नाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, युवक जिल्हा अध्यक्ष तेजस शिंदे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून जयंत पाटील म्हणाले सरकारमध्ये आणि समाजामध्ये पक्षाने वेळोवेळी काय भूमिका घेतली आहे. पक्ष सत्तेत असताना सरकार कडून कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा आहेत. विरोधकांनी केलेल्या हल्ल्यांना, टीकेला पक्ष व्यवस्थित उत्तर देतो की नाही, पक्षाचा विचार काय आहे, पक्षाने काय भूमिका घेणे अपेक्षित आहे, पक्ष पातळीवर तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे की नाही, ही कामकाज करताना पदाधिकाऱ्यांना काय अडचण येत आहे पक्षाची बैठक व्यापक करणे आणि कार्यकर्त्यांची संवाद जनसंपर्क साधने हा यामागचा हेतू आहे.
लोकशाही राजकारणात पक्ष संघटनेला अंत्यत महत्त्व आहे. विरोधी पक्षांची समाज माध्यमावर आणि माध्यमांवर मोठी पकड आहे. खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने खोटी माहिती समाजामाध्यमांवर पसरवली जाते. पक्ष घेऊन येणारे उपक्रम व ध्येयधोरणे समाजात तळागाळात पोहोचवावी. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. राजकीय पक्षातील दैनंदिन वाद-विवाद हल्ले प्रतिहल्ले आणि आपल्या पक्षाची धोरणे व भूमिका समाजासमोर मांडण्याची व प्रतिवाद करण्याची जबाबदारी ही फक्त पक्षाच्या कार्यकर्त्यांवर असते. कार्यकर्त्यांनी समाजाशी संवाद साधून आपली भूमिका तळागाळात पोहोचवावी. सातारा जिल्ह्यातील सर्व बूथ कमिट्या सर्व सेल पूर्ण क्षमतेने नियुक्त्या झाल्याबाबतची माहिती ताबडतोब घेणे कळवावी, अशी सूचना जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना जयंत पाटील यांनी केली. आमदार मकरंद पाटील यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी बेफिकीर न राहता पक्ष जनसंपर्क वाढवावा. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांची भाषणे झाली.