दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘सन 2009 पासून गेली सलग 15 वर्षे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात काम करणार्या दीपक चव्हाण यांनी श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध विकासकामांसाठी भरघोस निधी आणला आहे. विरोधकांनी त्यांच्या कामगिरीवरुन कितीही खोटा प्रचार केला तरी ते तालुक्याला लाभलेले अॅक्टीव्ह आमदार आहेत’’, असे मत पाडेगावचे माजी सरपंच तथा युवा नेते बाबासाहेब खरात यांनी व्यक्त केले.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढणारे, महाविकास आघाडी व राजे गट पुरस्कृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधताना बाबासाहेब खरात बोलत होते.
‘‘श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांनी फलटण तालुक्याच्या विकासात आजवर मोठे योगदान दिले आहे. मतदारसंघ राखीव झाल्यानंतर श्रीमंत रामराजे यांनी दीपक चव्हाण यांना संधी दिली. पहिल्यापासून त्यांच्या विश्वासास पात्र ठरल्यामुळेच त्यांना प्रत्येकवेळी उमेदवारी देण्यात आली. 15 वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्यावर आरोप करण्यासारखी कोणतीही गोष्ट घडलेली नाही. त्यांनी आमदारकीचा कधीही बडेजावपणा मिरवला नाही. कुणालाही कसला त्रास दिला नाही. श्रीमंत रामराजे यांच्या मार्गदर्शनात प्रामाणिकपणे मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी योगदान दिले आहे. त्याचीच पोच पावती म्हणून आपल्याला त्यांना विजयी चौकार मारण्याची संधी द्यायची आहे’’, असेही मत बाबासाहेब खरात यांनी व्यक्त केले.