दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२१ । सातारा । अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.
के.बी.पी. अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा येथे जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांची शिष्यवृत्तीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री .उबाळे बोलत होते. यावेळी जिल्ह्यात विविध महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी उपस्थित होते.
महाडिबीटी पोर्टलवरील अनु. जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०१९-२० व २०२०-२१ मधील शिष्यवृत्तीच्या मंजुर व प्रलंबित अर्जाचा, आधार कार्ड अद्ययावत नसणे तसेच आधार बँक खात्यशी संलग्न नसल्या कारणाने PFMS Account वर शिष्यवृत्ती अर्ज मंजुर होवुनसुध्दा प्रलंबित अर्जाबाबतचा आढावा घेण्यात आला.
महाविद्यालयानी विद्यार्थ्यांकडुन आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करुन घ्यावी जेणेकरुन कोणताही विद्यार्थी लाभापासुन वंचित रहाणार नाही. त्याचबरोबर सन २०२०-२१ मधील विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगिनला (sent Back to Applicant) आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी परत पाठविण्यात आलेले आहेत. सदरच्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्जातील कागदपत्रांची पुर्तता करुन घेवुन सदरचे अर्ज या कार्यालयास मंजुरीसाठी तात्काळ पाठविण्याची दक्षता घेण्याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांना श्री. उबाळे यांनी सुचित केले.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षामध्ये Mahadbt.mahait.gov.in या ऑनलाइन प्रणालीवर शिष्यवृत्ती चे अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक १४ डिसेंबर २०२१ पासुन सुरु झालेली आहे. सदर बाबत महाविद्यालयांनी व महाविद्यालय प्रशासनाने विशेष लक्ष देवुन महाविद्यालयातच विद्यार्थ्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देवुन विद्यार्थ्याकडुन अर्ज भरुन घ्यावेत. सदर अर्ज भरुन घेताना/ मंजुरी करताना विद्यार्थ्याची प्रोफाईल आधार बेस व बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करावी त्याचबरोबर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन घेवुन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तात्काळ मंजुरीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा या कार्यालयाकडे पाठविण्यात यावेत. असे अवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा श्री नितीन उबाळे यांनी या वेळी केले.
उपरोक्त प्रमाणे महाविद्यालयाने कार्यवाही न केल्यास व त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी यांचेवर कारवाई करण्यात येईल असे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी यावेळी बोलताना सांगीतले.