दैनिक स्थैर्य | दि. २६ जुलै २०२३ | सातारा |
नागठाणे (ता. सातारा) येथील जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न, अपरहण, दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चार जणांच्या शिकलगार टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.
साहिल रूस्तम शिकलगार (वय २६), भरत संजय मोहिते (२६), अमित ऊर्फ कन्हैया सुनील साळुंखे (२८), आशिष बन्सीरा साळुंखे (२७, सर्व रा. नागठाणे, ता. सातारा) अशी मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नाव आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपी साहिल शिकलगार, अमित साळुंखे यांनी त्यांच्या साथीदारांमार्फत एका व्यक्तीला कोयत्याने, पट्ट्याने मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पाठीवर व अंगावर मारहाण करून त्या व्यक्तीकडून २५ हजारांची रोकड जबरदस्तीने घेतली होती. या प्रकरणी वरील आरोपींवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय यापूर्वी या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, चोरी, कायदेशीर अटकेला प्रतिकार करणे, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर आणि बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी या टोळीविरुद्ध गुन्ह्यांची माहिती संकलित केली. त्यानंतर या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाईसाठी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यामार्फत हा प्रस्ताव पाठविण्यात आला.
या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक अमित सपकाळ, सहायक पोलिस फौजदार भोसले, हवालदार प्रवीण शिंदे, विशाल जाधव, बाळासाहेब जानकर, दादा स्वामी आदींनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी हे करत आहेत.