पालखीमार्गात येणाऱ्या अतिक्रमणावर आज कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । लोणंद । लोणंद शहरातील पालखीमार्गात येणाऱ्या खोकी धारकांची अतिक्रमणे आज सोमवार दिनांक २० रोजी प्रशासनाकडून हटवण्यास येणार आहेत.

लोणंद नगरपंचायतीने पालखी मार्गात अडथळा ठरणाऱ्या अनेक छोट्या टपरी ,खोकीधारकांना नोटीस बजावून अतिक्रमणे काढून घेण्यास सांगितले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज सोमवार पासून प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र या अतिक्रमण मोहिमेत छोटे व्यवसायीक आणि खोकीधारकांवर जाणूनबुजून अन्याय होत असल्याचा आरोप खोकी धारकांकडून केला गेलाय.

लोणंद येथे पालखीतळ परिसरातील अनेक छोट्या व्यवसायीकांना नगरपंचायतीने कलम १८० व १८९ प्रमाणे नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र खोकेधारकांनी राजकीय दबावापोटी या नोटीस फक्त गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या खोके-पत्रा शेड व टपरीधारकांना दिलेल्या आहेत असा आरोप केला आहे. तसेच त्याच परिसरातील बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून पक्के बांधकाम केलेल्या राजकीय वरदहस्त असणाऱ्या धनदांडग्यांना अशा प्रकारच्या नोटीस दिलेल्या नाहीत तसेच या नोटिसा फक्त पालखी तळाच्या परिसरातील खोकी व टपरी धारकांना दिलेल्या आहेत. परंतु लोणंद शहरामध्ये पालखी मार्गावरील फलटण पुलापासून ते पालखी तळापर्यंत व पालखी तळापासून खंडाळा व सातारारोड वरील कित्येक अतिक्रमणांना अशा प्रकारच्या नोटिसा दिलेल्या नाहीत असा आरोप केला आहे.

याबाबतचे निवेदन छोटे व्यवसायीक व खोकीधारकांनी लोणंद नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच तहसिलदार यांना देण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाकडून त्यांची कोनतीही दखलही घेण्यात आली नसल्याबद्दल खोकीधारकांनी प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला

राजकीय वरदहस्त असणारांचे अतिक्रमणही काढण्याची मागणी
लोणंदमधील हातावर पोट असणाऱ्या खोकीधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न असणारांचे अतिक्रमण नेहमीप्रमाणे बळाचा वापर करत हटवले जाते पण राजकीय वरदहस्त असणारांचे पक्के बांधकाम मात्र वर्षानुवर्ष तसेच उभे आहे. नक्की कोणती शक्ती हे अतिक्रमण काढण्यापासून प्रशासनाला रोखत असेल याचे कोडे सर्वसामान्य लोणंदकरांना अनेक वर्षापासून पडलेय.


Back to top button
Don`t copy text!