
स्थैर्य, कराड, दि. 6 : कोरोना संर्सगाच्या पार्श्वभूमीवर विना-मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करून वाहतुकीचे नियम तोडणार्या व्यक्ती व वाहनधारकांवर कराड शहर वाहतूक शाखेने कारवाई करत आतापर्यंत एकूण 28 लाख 85 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोना विषाणू संसर्ग रोखणे अनुषंगाने सातारा जिल्ह्यात व कराड तालुक्यामध्ये विनामास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणार्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सप्टेंबर 2020 पासून आदेश पारित केले आहेत. नमूद आदेश अनुषंगाने कराड शहरामध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरीता विना मास्क फिरणार्या व्यक्तींकडून 500 रुपये दंड व फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणार्या व्यक्तींवर 1 हजार रुपयांचा दंडाचे आदेश पारित झाले होते. सप्टेंबर महिन्यात कराड शहर वाहतूक शाखेकडून विना मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणार्या 1669 व्यक्तींवर कारवाई करून त्यांच्याकडून 28, 85, 600 रुपये एवढा दंड वसूल केला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखेच्या सर्व कर्मचार्यांनी केली आहे.
दरम्यान, कराड शहरातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता जिल्हाधिकार्यांनी घालून दिलेल्या नियमांप्रमाणे मास्कचा वापर करावा व फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करावा. वाहनधारकांनी वाहन चालविताना सर्व नियम पाळून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन कराड शहर वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.