मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई; भिंतीत १० कोटींची रोकड, १९ किलो चांदीच्या विटा सापडल्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ एप्रिल २०२२ । मुंबई ।  मुंबईच्या झव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले. त्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 19 किलो वजनाच्या (13 लाख रुपये किमतीच्या) चांदीच्या विटा आढळून आल्या.

राज्य जीएसटी विभागाने ही जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे. राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य करविभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी, उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कर आयुक्त राजीव मित्तल यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!