
स्थैर्य, सातारा, दि.२२: वनविभागाच्या सातारा भरारी पथकाने कराड आणि पाटण तालुक्यात विनापरवाना करंज लाकडाची वाहतूक करणार्या दोघांवर कारवाई केली आहे. यापैकी एक कारवाई पाटण तालुक्यातील आंबळे येथे तर दुसरी कारवाई कराड तालुक्यातील भोळेवाडी येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी वनविभागाने सोपान लक्ष्मण पन्हाळे (रा. कडवे, ता. पाटण) आणि सुरेश मारुती देशमाने (रा. उंब्रज, ता. कराड) या दोघांवर भारतीय वन अधिनियमप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पाटण आणि कराड येथून मोठ्या प्रमाणात विनापरवाना लाकडांची वाहतूक होत असल्याची माहिती वनविभागाच्या सातारा भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार विविध ठिकाणी तपासणी करण्याचे काम चालू होते. दरम्यान, शुक्रवार, दि. 19 रोजी सातारा भरारी पथक रात्र गस्त घालत असताना त्यांना बांववडे – तारळे रस्त्यावर पाटण तालुक्यातील आंबळे गावच्या हद्दीत विना नंबरच्या ट्रॅक्टरमून करंज प्रजातीचा लाकूडमाल विनापरवाना वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. दुसरी कारवाई कराड तालुक्यात करण्यात आली असून शनिवार, दि. 21 रोजी सातारा भरारी पथक रात्र गस्त घालत असताना त्यांना चरेगावं – म्होप्रे रस्त्यावर कराड तालुक्यातील भोळेवाडी येथे एका ट्रॅक्टरमधून (एमएच 11 – जी 1447) मध।न सावर प्रजातीचा लाकूडमाल विनापरवाना वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
या दोन्ही कारवाईत आढळलेला लाकूडमाल आणि वाहने असा 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सोपान लक्ष्मण पन्हाळे, सुरेश मारुती देशमाने या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सातारा वन परीक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सचिन डोंबाळे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस हवालदार सुहास पवार आदी सहभागी झाले होते.