
दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । माण । मलवडी (ता.माण) येथे परकंदीकडे जाणाऱ्या रोडवरील एका घराच्या आडोशाला जुगार खेळणाऱ्यांवर डीवायएसपी कार्यालयातील पथकाने व दहिवडी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत मलवडीचे लोकनियुक्त सरपंच दादासो शामराव जगदाळे यांच्यासह संतोष गणपत चिरमे, अशोक छगन जाधव, शंकर हणमंत मदने, गिरीष वसंत जाधव, शेखर आकुबा जाधव, सुर्यकांत गणपत बोराटे, दीपक मनीराज जगताप, जार्नदन बबन जाधव (सर्व रा. मलवडी,ता.माण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हवालदार तानाजी चंदनशिवे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वरील सर्व संशयित हे मलवडी ते परकंदी जाणाऱ्या रोडवर मलवडी गावातील विजय खरात यांच्या जुन्या घराच्या आडोशाला तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती डीवायएसपी डॉ.निलेश देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यालयातील एक टिम व दहिवडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना संयुक्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या टिमने घटनास्थळी धाड टाकली असता वरील सर्व संशयित हे तीन पानी पत्ते पैशावर खेळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा साडे तीन हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्यावर गॅमलिंग ऍक्टनुसार दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस करत आहेत.