दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२१ | सातारा | सातारा तालुक्यातील आटाळी आणि शिवथर या दोन वेगवेगळ्या ठिकाणी विनापरवाना वृक्षतोड केल्याच्या कारणावरून चार जणांवर कारवाई केल्याची माहिती सातारा तालुक्याचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी दिली.
दि. ८ नोव्हेंबर रोजी आटाळी गावच्या हद्दीत आकाश बाचल यांच्या जमिनी मध्ये विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता अतित, ता. सातारा येथील बाळासाहेब लोहार या लाकूड व्यापाऱ्याकडून बेकायदेशीर विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आकाश बाचल आणि बाळासाहेब लोहार या दोघांवर वन विभागाच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
दि. ९ नोव्हेंबर रोजी शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत रघुनाथ साबळे यांच्या शेतामध्ये बेकायदेशीर विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळाली. वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता मालगाव, ता. सातारा येथील ताजुद्दीन अब्दुल मुलाणी उर्फ अंतुले नावाचा लाकूड व्यापारी वृक्षतोड करत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात रघुनाथ साबळे आणि ताजुद्दीन अब्दुल मुलाणी उर्फ अंतुले यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून व वृक्षतोड करण्याकरता वापरण्यात आलेला कटर मशीन, ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. १३ ए. ९९५८ जप्त करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वनसंरक्षक सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, वनरक्षक सुहास भोसले, मारुती माने, दत्तात्रय गीते वाहन चालक संतोष दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.