ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची कार्यवाही करावी – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य,बुलडाणा, दि. 3 : सध्या महसूल मंडळ ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र लावण्यात आलेले आहे. त्यामुळे महसूल मंडळातील 10 ते 12 गावांतील पर्जन्याची आकडेवारी संपूर्ण महसूल मंडळाची गृहीत धरली जाते. मात्र अनेक मंडळाच्या गावात पाऊस कमी झाला, पण मंडळातील अन्य गावांमध्ये पाऊस जास्त झाला. त्यामुळे त्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र मंडळाच्या ठिकाणी पडलेल्या कमी पावसाची नोंद संपूर्ण मंडळात गृहीत धरल्यामुळे त्या गावातील नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान असूनही मदतीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे पुढील काळात ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्याबाबत चाचपणी करून कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केल्या आहेत.

स्थानिक विश्राम गृह येथे 2 नोव्हेंबर 2020 रोजी नुकसानीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार असून मदतीच्या निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी अन्य पर्यायांचा अवलंब करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ.शिंगणे म्हणाले, पर्यायांचा अवलंब करताना कुणीही पात्र नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून सुटणार नाही, याबाबत काळजी घ्यावी. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाने खऱ्या नुकसानीच्या परिस्थितीबाबत जनजागृती करावी. जिल्ह्याची सुधारीत पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बरेच तालुके 50 पैशांच्या पेक्षा जास्त आहेत. तरी अंतिम पैसेवारी काढताना 50 पैशांच्या आत काढण्याचा प्रयत्न करावा. ही पैसेवारी 50 पैशांच्या आत आल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. यावेळी पिक विमा, पैसेवारी आदींबाबत चर्चा करण्यात आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!