दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२३ । मुंबई । महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत विधानपरिषद सदस्यांसाठी एकदिवसीय कृतीसत्राचे आयोजन विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० यावेळेत विधान भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. या कृतीसत्रात विविध संसदीय आयुधे, समिती पध्दत, विधेयके या विषयांवर तीन सत्रे होतील.
या कृतीसत्राचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद सदस्य तथा माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानपरिषद सदस्य सर्वश्री प्रविण दरेकर, ॲड. अनिल परब, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कृतीसत्रासाठी वक्ते म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विविध संसदीय आयुधे) सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (समिती पध्दत) सह सचिव डॉ. विलास आठवले व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधेयके) सेवानिवृत्त प्रधान सचिव विलास पाटील हे उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक सत्राचे अध्यक्षस्थान अनुक्रमे विधानपरिषद सदस्य अशोक ऊर्फ भाई जगताप, कपिल पाटील आणि एकनाथराव खडसे – पाटील हे भूषवतील.
विधानपरिषद सदस्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत यांनी केले आहे.