स्थैर्य, वडूज, दि. २८ : भुरकवडी मध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून 15 लाख 5 हजार रुपयांचा मुद्दे माल जप्तभुरकवडी ता. खटाव गावाच्या हद्दीत येरळा नदीच्या पात्रात वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर आज वडूज सपोनि मालोजीराव देशमुख यांनी व सहकाऱ्यांनी कारवाई केली असून याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वडूज पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की, भुरकवडी येथे येरळा नदी पात्रात जेसीबी व ट्रॅक्टर च्या साहायाने वाळू उपसा सुरू असल्याची माहिती वडूजचे सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना बातमीदाराकडून मिळाली.
त्यांनतर वडूज पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संग्राम बाबर, श्री खाडे, श्री ओंबासे, श्री पाटील हे खाजगी वाहनाने भुरकवडी ते सिद्धेश्वर रोडवरील येरळा नदीपात्रात गेले . त्याठिकाणी त्यांना जेसीबीच्या व ट्रॅक्टर च्या साहायाने वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी त्यांनी गौण खनिज वाळू उत्खनन करण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली असता त्याठिकाणी असलेल्या व्यक्तींनी परवाना नसल्याचे पोलिसांना सांगितले.
त्यांनतर त्यांच्याकडील दहा लाख रुपये किमतीचा एक जेसीबी, पाच लाख रुपये किमतीचा एक ट्रॅक्टर, व पाच हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा मुद्देमाल पोलिसांनी वडूज पोलीस ठाण्यात आणून जप्त केला. व वाळू उत्खनन करणरऱ्या तीघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वडूज पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणारी वाहने पोलीस ठाण्यात आणून जप्त केली आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत वडूज नगरीतून सपोनि मालोजीराव देशमुख यांचे कौतुक होत आहे.