दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । सातारा । सातारा शहरालगत सोनगाव संमत निंब ता. सातारा येथे सातारा शहर पोलिसांनी वाळू उपशावर कारवाई करत ४१ लाख २0 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे वाळू उपसाधारकांचे धाबे दणाणले आहेत. अनिकेत दिलीप डांगे वय २१, रा. क्षेत्रमाहुली ता.सातारा व जनार्दन जयवंत देसाई रा.कार्वे ता.कराड या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून यातील अनिकेत डांगे याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, जयवंत देसाई हा मालक असल्याची कबुली संशयित अनिकेत डांगे याने पोलिसांना दिली आहे.
याबाबत सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलिस ठाण्यााचे सपोनि चेतन मछले यांना सोनगाव सं.निंब येथील कृष्णा नदीपात्रात वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन दि. २४ रोजी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता वाळूचे उत्खनन सुरु असल्याचे निदर्शनास आले. यावेळी अनिकेत डांगे याला पोलिसांनी ताब्यात घेवून अधिक चौकशी केली. दुसरीकडे पोलिसांनी जेसीबी पोकलॅन्ड, दोन चाकी ट्रॅक्टरची हायड्रोलिक ट्रॉली, दुचाकी, वाळूचे ढीग असा मुद्देमाल होता. पोलिसांनी तो सर्व जप्त केला.
घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी महसूल विभागाकडून अधिक माहिती घेतली असता वाळूचे बेकायदा उत्खनन होत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी संशयित दोघांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यातील डांगे याला अटक करण्यात आली.