दैनिक स्थैर्य । दि. ०३ मार्च २०२२ । सातारा । नैतिकदृष्ट्या गैरवर्तणूक, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असलेली तक्रार, अशा गंभीर आरोपांमुळे राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यकारी संचालक सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा धीरज पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याच बरोबर त्यांची बदली होमगार्डला केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाटील यांची चौकशी प्रलंबित आहे. याच प्रकरणात लोकायुक्त यांच्याकडेही तक्रार दाखल आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
पाटील यांच्या विरोधात विद्युत विभागाच्याही अनेक तक्रारी आहेत. महत्त्वाच्या बंदोबस्ता वेळी, मुख्यालयाची कोणतीही परवानगी न घेता बाहेर फिरणे, खासगी वाहनावर लाल दिवा लाऊन फिरणे, अशा तक्रारी विद्युत विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, असल्याचे आदेशात म्हटले आहे.
निलंबनाच्या कारवाईनंतर त्यांची बदली मुंबई होमगार्डच्या मुख्यालयात करण्यात आली आहे. होमगार्डच्या संचालकांच्या परवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी परवानगी न घेता मुख्यालय सोडले तर ती त्यांची गैरवर्तणूक ठरेल, त्यामुळे कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही राज्य सरकारने दिला आहे.