दैनिक स्थैर्य । दि.२३ मार्च २०२२ । मुंबई । बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी संस्थानची जमीन मालकी हक्क घोषित करण्याबाबत प्राप्त अर्ज मंजूर केल्यानंतर उपजिल्हाधिकारी (सामान्य) बीड यांच्या आदेशाविरुद्ध सचिव योगेश्वरी यांनी अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे अपील दाखल केले आहे. देवस्थान इनाम व वक्फ जमिनीसंदर्भात पारीत करण्यात आलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तत्कालीन उपजिल्हाधिकारी (सामान्य) बीड यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिली.
याबाबत विधान परिषद सदस्य संजय दौंड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना महसूल मंत्री बोलत होते.
महसूल मंत्री म्हणाले, बीड जिल्ह्यातील देवस्थान इनाम वक्फ जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत चौकशी करुन 3 महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. अपर जिल्हाधिकारी यांच्या अहवालाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असे महसूल मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले.