दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । सातारा । सातारा शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक झाले याची दखल घेऊन सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने अतिक्रमण मोहिमेची सुरुवात हुतात्मा उद्यान परिसरातून केली सुमारे तीन तासाच्या कारवाईमध्ये हुतात्मा उद्यानाला घेरणाऱ्या नऊ हातगाडया आणि टपऱ्या यावेळी हटवण्यात आल्या.
सातारा शहरातील अतिक्रमण यांच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच ही अतिक्रमणे तातडीने हटवणे अशा सूचनाही केल्या होत्या. मात्र प्रशासन पालिका निवडणुकांच्या कार्यक्रमात गुंतून पडल्याने अतिक्रमण हटाव कारवाईला वेग आला नव्हता. सोमवारी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सातारा शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या संदर्भात थेट उपोषणाचा पवित्रा घेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. त्यामुळे सातारा पालिकेत तातडीने फोनाफोनी होऊन प्रशासन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अतिक्रमण हटाव विभागाला तात्काळ अतिक्रमण मोहिमेवर रवाना केले.
प्रशांत निकम त्यांच्याबरोबर 20 कर्मचारी एक जेसीबी आणि दोन टिपर अशी यंत्रणा हुतात्मा उद्यान परिसरात दाखल झाली. उद्यानाला लागून पदपथावर पथारी मांडलेल्या नऊ टपर्या हटवण्यात आल्या. यावेळी वादावादीचे प्रसंग घडले मात्र या सर्व अतिक्रमणांना पालिकेने भीक न घालता पोलीस बंदोबस्तात कारवाई पूर्ण केली. हुतात्मा उद्यान परिसरातील फूटपाथ नागरिकांसाठी असताना त्याच्यावर अतिक्रमण कशासाठी असा प्रश्न सामान्य यांनी यावेळी उपस्थित केला.
दुर्गा पेठ परिसरातील शाही मशीदच्या समोरील टपऱ्या आज अतिक्रमण हटाव विभागाने हटवल्या याशिवाय आळूचा खड्डा येथील पार्किंग जागेतील टपरी सुद्धा उचलण्यात आली तसेच अनधिकृत 12 फ्लेक्स बोर्ड जप्त करून त्यांच्याकडून पाचशे रुपये प्रमाणे सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. गोडोली येथील ग्रामपंचायत रेकॉर्ड नुसार मालमत्ता क्रमांक 426 सर्वे नंबर 73 व 75 येथील ज्ञानदेव जगताप यांचे हॉटेल्स जीवनचे अतिक्रमण तात्काळ पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर काढण्यात येणार आहे असे लेखी आश्वासन अभिजीत बापट यांनी आंदोलन करते सुशांत मोरे यांना दिले आहे.