
दैनिक स्थैर्य । दि.०३ जानेवारी २०२२ । सातारा । शुक्रवार दि. 31 डिसेंबर रोजी रात्री 9 नंतर मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱया व विनाकारण फिरणाऱयांवर पोलिसांनी कारवाया केल्या. जिल्हय़ात विविध ठिकाणी नाकाबंदी करत संशयित वाहने पकडून त्यांची तपासणी करण्यात येत होती. सातारा शहरात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱया 13 जणांवर वाहतुक शाखेने धडक कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तसेच कराडमध्ये पोलिसांनी नाकाबंदी करत तब्बल 34 जणांवर कारवाया केल्या आहेत. यासह जिल्हय़ात विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कारवाया झाल्या आहेत.
कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही निर्बंध आणले असल्यामुळे अनेकांनी शुक्रवारी 31 डिसेंबर आपल्या घरीच साजरा केला. वाहतूक शाखेच्या पथकाने पोवईनाका, राजवाडा, मोती चौक, शाहू चौक, बोगदा, बॉम्बे रेस्टॉरंट, मोळाचा ओढा, वाढे फाटा, अजंठा चौक येथे शुक्रवारी सायंकाळी सात नंतर नाकाबंदी करत वाहनचालकांची तपासणी केली असता त्यामध्ये 13 वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे आढळून आले. त्या सर्वांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस दलाच्यावतीने रात्री 9 नंतर बाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आले होते. रात्रीची संचारबंदी जारी करण्यात आली होती. या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱया नागरिकांवर सातारा शहर सातारा, सातारा तालुका, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पथकांनी कारवाई केली. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने कास, यवतेश्वर, परळी खोरे येथे वनविभागाच्या हद्दीत तपासणी केली असता त्याठिकाणी कोणीही आढळून आले नाही. पहाटे तीन वाजेपर्यंत पथकाने रात्रगस्त घातली.