दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । सेफेक्स केमिकल्स ह्या अग्रगण्य अॅग्रो केमिकल कंपनीने आपला कृषी ते घरगुती देखभालीच्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ पूर्ण करण्यासाठी गुजरात स्थित शोगन लाइफसायन्सेस ही कंपनी हस्तगत करून आपल्या विकासाच्या वाटचालीमध्ये आणखी एक मोठी झेप घेतली आहे.
शोगन लाइफसायन्सेस ही कंपनी अॅल्युमिनयम फॉस्फाइड आणि झिंक फॉस्फाइड निर्मितीच्या व्यवसायामध्ये कार्यरत असून अहमदाबादजवळ कंपनीची उत्पादन केंद्रे आहेत. अॅल्युमिनियम फॉस्फाइड हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि एकल रेणू आहे, ज्याचा वापर अन्नधान्याच्या सुरक्षित साठवणुकीसाठी तसेच साठवणुकीच्या जागांचे फ्युमिगेशन करण्यासाठी अर्थात धूराने या जागा निर्जंतुक करण्याच काम होते.
सेफेक्सचे संस्थापक संचालक श्री. एस. के. चौधरी म्हणाले, “फ्युमिगन्ट्सचा तुटवडा असल्याने जगभरात अन्नधान्याची खूप मोठ्या प्रमाणात नासाडी होते. अन्नधान्याची सुरक्षित साठवणूक करणे हे जगभरातील कुपोषण थांबविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. आजघडीला अन्नधान्याच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आवश्यक फ्युमिगन्ट्स निर्माण करणा-या कंपन्या अगदी मोजक्या आहेत. या अधिग्रहणामुळे सेफेक्स ही पिकांचे पोषण, तण नियंत्रण, प्रतिबंध, संरक्षण, धान्याची सुरक्षित साठवणूक आणि गृहदेखभालीसाठीची रसायने या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पुरविणारी भारतातील एकमेव कंपनी बनली आहे. शोगन लाइफसायन्सेसच्या अधिग्रहणामुळे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सेफेक्सला १० बिलियन रुपयांच्या विक्रीचे उद्दीष्ट वेगाने गाठता येणार आहे.”
गृहदेखभालीसाठीचे सक्रिय घटक तयार करणा-या शोगन ऑर्गॅनिक्स लि. या शोगन लाइफसायन्सेसच्या संपूर्ण मालकीच्या पुणेस्थित कंपनीच्या माध्यमातून सेफेक्सने शोगन लाइफसायन्सेसचे अधिग्रहण केले. शोगन ऑर्गेनिक्स ही कंपनी सेफेक्सने काही वर्षांपूर्वीच अधिग्रहित केली आहे.
या अधिग्रहणामुळे कंपनीच्या उत्पादनश्रेणीचा विस्तार होईलच, पण त्याचबरोबर कंपनीला कृषीउत्पादनांच्या सुरक्षित साठवणुकीवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येईल व त्यातून कंपनीशी जोडल्या गेलेल्या लक्षावधी लोकांना ही उत्पादने उपलब्ध करून देता येतील. शोगन लाइफसायन्सेसच्या साथीने कंपनीने हस्तगत केलेला ८ एकरांचा भूभाग कंपनीच्या विद्यमान आणि भावी व्यवसायांची पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी वापरला जाईल. येत्या काळात कंपनीकडून विविध उत्पादनांच्या निर्मिती विभागांसाठी आणखी निर्मितीकेंद्रे तयार केली जातील व अॅल्युमिनियम फॉस्फाइड निर्मितीच्या कंपनीच्या सध्याच्या क्षमतेत वाढ केली जाईल.