
स्थैर्य, फलटण, दि. १७ ऑगस्ट : के. बी. उद्योग समूहाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन ७२ तास उलटले तरी, फलटण शहर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, असा गंभीर आरोप समूहाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत खलाटे यांनी केला आहे. आरोपी मोकाट फिरत असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमक्या देत आहे, तरीही पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे, असेही ते म्हणाले.
याबाबत अधिक माहिती देताना हेमंत खलाटे यांनी सांगितले की, “एका व्यक्तीने सोशल मीडियावर कंपनीची बदनामी करून १० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी आम्ही १५ ऑगस्ट रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद (गु.र.नं. २७३/२०२५) दाखल केली. मात्र, पंचनामा होऊन ४८ तास उलटले तरी आरोपीवर कोणतीही कारवाई झालेली नाही.”
“माझं कुणीही वाकडं करू शकत नाही, पोलिसांची मला अटक करायची हिंमत नाही,” असे म्हणत आरोपी शहरात उघडपणे फिरत आहे आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे, असे कंपनीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अन्यथा कंपनीला स्थलांतर करण्याचा विचार करावा लागेल…..
के. बी. समूहामुळे फलटणसारख्या ग्रामीण भागात हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. देश-विदेशातील शास्त्रज्ञ येथे काम करत आहेत. मात्र, अशा घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून आरोपीला अटक करावी, अन्यथा कंपनीला स्थलांतर करण्याचा विचार करावा लागेल, अशी खंत खलाटे यांनी व्यक्त केली.