दैनिक स्थैर्य । दि. १३ मे २०२२ । सातारा । अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने अशोक शंकर माने वय 25 राहणार ढेण, ता. पाटण याला दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सातारा जिल्हा न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश एस के पटणी यांनी हे आदेश दिले. या केसमध्ये एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्याची माहिती अशी ढेण, ता. जावली येथील अल्पवयीन मुलीवर आरोपी अशोक माने याने जीवे मारण्याची धमकी देऊन रात्रीच्या वेळी तिच्यावर अत्याचार केले. या अत्याचारामुळे मुलगी गरोदर राहिली होती. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.
गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. विशेष सत्र न्यायाधीश एसके पटणे यांच्या कोर्टात हा खटला चालू होता. सरकारी वकील नितीन मुकेश यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यामध्ये तेरा साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी माने याला अल्पवयीन मुलीच्या अत्याचारप्रकरणी दोषी ठरवून पोस्को कलम 3 व 4 अंतर्गत दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्याच्या कामासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, प्रोसेक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक आर. एल. फरांदे, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, पोलीस हवालदार गजानन फरांदे, सुधीर खोडे, रेहाना शेख, राजेंद्र कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी मदत केली.